निवडणूक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्‍याची गरज- विजय कुमार चढ्ढा 

1445

मल्हार न्यूज प्रतिनिधी,पुणे,

-लोकसभा निवडणुका शांत, निष्‍पक्ष, मुक्‍त वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्‍याची गरज असून सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार चढ्ढा यांनी दिल्‍या. व्‍हीव्‍हीआयपी सर्किट हाऊसवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे समन्‍वय अधिकारी अजित रेळेकर, मिडीया सेंटरच्‍या नंदिनी आवडे, राज्‍य उत्‍पादन शुल्‍कचे अधीक्षक तडवी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

चढ्ढा यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व भागाचा दौरा केला आहे. प्रचारासाठी होणारा निवडणूक खर्च उमेदवारांकडून सादर होतो, पण प्रत्यक्षात होणारा खर्च आणि सादर होणारा खर्च यात तफावत असण्‍याची शक्‍यता असते, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांनी दक्ष राहून निवडणुकांवर होणारा खर्च लक्षात आणून दिला पाहिजे. मावळ, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघातील काही बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्‍याच्‍या सूचना चढ्ढा यांनी दिल्‍या. पेट्रोल-डिझेल, दारु यांचा गेल्‍या तीन महिन्‍यातील वापर आणि उलाढालींची माहितीही त्‍यांनी संकलित करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. सोशल मिडीया, पेड न्‍यूजबाबतही आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी, मतदारांना किंवा एकगठ्ठा मतांसाठी प्रयत्‍न करणा-यांना काही उमेदवार टूर पॅकेज देण्‍याची शक्‍यता असते, यावरही लक्ष ठेवण्‍यात यावे, कम्‍युनिटी सेंटर, बँक्‍वेट हॉल, स्‍वयंसहायता बचत गट याबाबतही आवश्‍यक ती माहिती संकलित करण्‍याचे तसेच ग्रूप एसेमेससाठी टेली‍फोन ऑपरेटरींग कंपन्‍याची बैठक घेण्‍याची सूचना त्‍यांनी केली.