Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेहलका – फुलका ‘वेडिंगचा शिनेमा’

हलका – फुलका ‘वेडिंगचा शिनेमा’

भूपाल पंडित
बॉलीवूड आणि भव्य विवाह सोहळा यांचे एक अतूट नाते निर्माण झालेले आहे. त्या तुलनेत मराठी चित्रपटात विवाह सोहळ्याची भव्यता दिसत नाही. सामान्यता लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात, त्यात अलीकडे प्री वेडिंग शुटींगचे फॅड आलेले आहे, याच प्री वेडिंग शूटिंगची मनोरंजक कथा म्हणजे डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ आहे.
चित्रपटाची कथा सासवड या गावात घडणारी आहे. मुंबईतल्या प्रतिष्ठीत डॉक्टर दांपत्याची एकुलती एक मुलगी परी प्रधान (ऋचा इनामदार) मेडिकल इंटर्न म्हणून या गावात येते. तिथे एका मोबाईल शॉपचा मालक असलेल्या प्रकाश शहाणे (शिवराज वायचळ) च्या प्रेमात पडते. अवघ्या दोन अडीच महिन्यात त्यांचं लग्न ठरतं आणि मग हल्लीच्या लग्नातल्या ट्रेंडप्रमाणे लग्नाच्या व्हिडीओसारखा प्री-वेडिंग व्हिडीओ तयार करण्याचा निर्णय घेतला जातो. या फिल्मची जबाबदारी उर्वी (मुक्ता बर्वे) स्वीकारते. मुळात तिला एक हटके विषय घेऊन चांगला चित्रपट निर्माण करायचा आहे, मात्र निर्माते मिळत नसल्याने ती या कामाला तयार होते. यां दरम्यान मनाने कोरड्या असलेल्या उर्वीला नात्यांचे पदर उलगडायला लागतात. त्यांच्यातली गंमत दिसायला लागते. नेहमीच्या पठडीतलं, टीपिकल अशी नावं ठेवल्या गेलेल्या अनेक गोष्टी आणि त्यामागचे अर्थ तिला उलगडायला लागतात. पुढे नक्की काय होते हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा.
डॉ. सलिल कुलकर्णी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या पटकथेत नाविन्य असले तरी कथेत तसं फारसं नाविन्य नाही. आपण अशा प्रकारच्या अनेक कथा आधीच पडद्यावर पाहिल्या आहेत. एक शहरी मुलगी गावाकडच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करायला तयार होते, मग दोन्हीकडची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांच्या आवडीनिवडी, भाषा, सामाजिक परिस्थिती यातल्या फरकामुळे अनेक गमतीजमती घडतात. जोडीला चटपटीत संवाद आहेत. यामुळे कथेला वेग आला आहे. लग्नातल्या लहानसहान गोष्टी, ग्रामीण बाजात हेरलेल्या लग्नातल्या छोट्या छोट्या अडचणी यात वापरण्यात आलेले संवाद प्रेक्षकाला हसवतात.
कलाकारांच्या अभिनयाबाबत सांगायचं झालं तर मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका आठल्ये यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे यांच्या भूमिका सुंदर झाल्या आहेत.  भाऊ कदमचा कॅमेरामन लक्षात राहतो.  संकर्षण कऱ्हाडे, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ यांचाही अभिनय उत्तम झाला आहे. 
चित्रपटाचे संगीत चांगले झाले आहे, बोल पक्या, उगीचच का भांडायचं  आणि इतर गाणी प्रसंगानुरुप आहेत. त्यामुळे कथा एकसंघ वाटते. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्तम आहे. थोडक्यात ‘वेडिंगचा शिनेमा’ बद्दल सांगायचे तर आजपर्यंत संगीतकार म्हणून ओळखले जाणाऱ्या सलिलं कुलकर्णी यांचे दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण झाले आहे. एक निखळ मनोरंजक, हलका फुलका  सिनेमा म्हणून एकदा पाहायला हरकत नाही.
चित्रपट – वेडिंगचा शिनेमा
निर्माता  –  गेरुआ प्रॉडक्शन्स, पीईएसबी
दिग्दर्शक  – डॉ. सलील कुलकर्णी
कलाकार – मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ,  ऋचा इनामदार, भाऊ कदम, प्रविण तरडे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, आश्विनी काळसेकर, संकर्षण  कर्हा डे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे.
रेटिंग – ***
भूपाल पंडित

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!