व्हॉट्सॲपवरील चुकीच्या संदेशाबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

619

पुणे प्रतिनिधी

: मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्र.७ भरून मतदान करता येते, अशी माहिती सध्या व्हॉटस्ॲप व इतर समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल होत आहे. ही माहिती खोटी असून फॉर्म क्र. ७ हा इतर व्यक्तिंचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तिचे नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज आहे. त्यामुळे हा मेसेज खोटा असून मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहे.
व्हॉटस्ॲप व फेसबुक या समाज माध्यमांवर फॉर्म ७ भरून मतदान करता येते, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. फॉर्म क्रमांक ७ हा इतर व्यक्तिंचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी,स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तिंचे नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी अर्ज करण्यासंदर्भातील आहे. या फॉर्मद्वारे मतदान करता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरणारी यासंबंधीच्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव असेल आणि मतदार ओळख पत्र नसले तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर अकरा ओळखपत्रांच्याद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.