दिव्यांग मतदार जागृती रॅलीचे आयोजन

718

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी रॅलीचा शुभारंभ करून स्वत: त्यात सहभाग घेतला.
पं.नेहरु पुतळ्यापासून रॅलीचा शुभारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.
समारोपप्रसंगी बोलताना श्री.मंजुळे म्हणाले, दिव्यांग बांधवांनी मतदानाबद्दल दाखविलेला उत्साह जिल्ह्यातील सर्व मतदारांनी दाखवावा. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा.राष्ट्राप्रती असणारे महत्वाचे कर्तव्य म्हणून सर्व मतदारांनी मतदान करावे,असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी दिव्यांग बांधवांचे मतदार जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले.
रॅलीत सहभागी दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि घोषवाक्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. रॅलीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे सहकोषाध्यक्ष शिवाजीराव मोरे आणि दिव्यांग मतदार उपस्थित होते.
निवडणुक आयोगाने यावेळी‘सुलभ मतदान’ संकल्पनेवर भर दिला असून मतदानाच्यावेळी दिव्यांग मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.या सुविधांसाठी‘पीडब्ल्युडी’ ॲपदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. हालचाल करण्याचा असलेल्या दिव्यांग मतदारांना वाहतूक आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अशा मतदारांना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.