वानवडी पोलीस स्टेशनमधील पोलिसाला लाच घेताना पकडले

742

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ब.नं.२६४७,  निसार मेहमूद खान वय ४४ आणि मेहंदी अजगर शेख वय ३२, रा.हडपसर या खाजगी इसमास ५००० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

  याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार   यातील तक्रारदार ४५ वर्षीय महिलेचे आंनदनगर हडपसर येथे सर्व्हे नंबर १०८/१०९ येथे  भंगार विकण्याचा व्यवसाय आहे. हि तक्रारदार महिला चोरीचा माल खरेदी करून विकत आहे असा आरोप करून तश्या तक्रारी आल्या आहेत असे म्हणून पोलीस हवालदार निसार खान हे तिला त्रास देत होते. यामध्ये जर कारवाई करायची नसेल आणि यापुढेही भंगार माल विकायचा धंदा करायचा असेल तर वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निसार खान यांनी त्या महिलेकडे १५०००हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती ५००० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदार महिलेची लाच देण्याची मानसिकता नसल्याने तिने त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याने एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपाधीक्षक वर्षा राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने सापळ्याचे आयोजन केले. त्यानुसार हडपसर येथील ताज फर्निचर येथे खाजगी इसम मेहंदी शेख याच्याकडे लाच देण्याचे ठरले,  यानुसार एसीबीने तिथे सापळा लावला. पोलीस हवालदार निसार खान यांच्यातर्फे लाचेची ५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम मेहंदी अजगर शेख याला रंगेहात पकडण्यात आले असून पुढील तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपाधीक्षक वर्षा राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.