सुट्टीचा आनंद जरुर घ्या पण पहिले मतदानाचा हक्क बजावावा

574

गिरीश भोपी, रायगड

सुट्टी परत परत येईल पण मतदानाची संधी ५ वर्षानंतर येणारी आहे त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमुल्य हक्क बजावा असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी पनवेल, उरण आणि कर्जतमधील मतदारांना केले आहे. या तीन मतदारसंघात मिळून ११ लाख ९ हजार २५० मतदार आहेत. एकूण २१ उमेदवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात आणि त्याठिकाणी सोमवार २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

मतदारांना केलेल्या आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी म्हणतात कि, पनवेल- उरणमधून आपण मुंबई-ठाण्यात नोकरी व्यवसायासाठी जाता, आपल्या कुटुंबातील तरुण आयटी, सर्व्हिस सेक्टर मध्ये किंवा खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या भागाचे, मतदारसंघाचे पर्यायाने देशाचे भवितव्य ठरविण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. मतदानाचा दिवस ही सार्वजनिक सुट्टी आहे , पण या सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावणे विसरू नका. सुट्टी परत परत येईल पण मतदानाची संधी ५ वर्षानंतर येणारी आहे.

मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या पनवेल, उरण आणि पुण्याच्या जवळ असलेल्या कर्जत, खोपोली भागातील आपण सर्व मतदार सुजाण आहात, सुशिक्षित आहात. मतदानाचे महत्व आपणास ठाऊक आहे त्यामुळे एक जबाबदार, नागरिक म्हणून आपली ओळख सिद्ध करा आणि हा राष्ट्रीय महोत्सव साजरा करा असेही ते म्हणतात.

मतदानासाठी ११ ओळखपत्र पुरावे

मतदान ओळखपत्र नसले तरी मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

त्यासाठी खालील ११ पुरावे ग्राह्य धरले जातील. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था/ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर, आमदार/खासदार यांचे ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाईल.

अधिक माहितीसाठी १९५० हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा किंवा https://www.nvsp.in/ या संकेतस्थळांना भेट द्या

११ लाख ९ हजार २५० मतदार

३३–मावळ मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत या तीन मतदार संघात मिळून ११ लाख ९ हजार २५० मतदार आहेत. यामध्ये पुरुष 5 लाख 77 हजार 180 आणि महिला ५ लाख ३२ हजार ६७ आणि तृतीयपंथी ३ आहेत. (मतदारसंघनिहाय: पनवेल ५ लाख ३९ हजार १८७ , उरण २ लाख ९० हजार २७३, कर्जत २ लाख ७९ हजार ७९०)

१२६६ मतदान केंद्रे

या तीन मतदारसंघात मिळून एकूण १२६६ मतदान केंद्रे आहेत. (मतदारसंघनिहाय: पनवेल ५८४, उरण ३३९, कर्जत ३४३)

२७४ सर्व्हिस व्होटर्स

एकूण २७४ सर्व्हिस व्होटर्स आहेत. (मतदारसंघनिहाय: पनवेल १७०, उरण ४१, कर्जत ६३, )

सखी मतदान केंद्रे ३

एकूण ३ सखी मतदान केंद्रे असतील. केंद्र क्रमांक ३४४ पनवेल महानगरपालिका, १६६ क्रमांक कर्जत ८, आणि २२९ क्रमांक उरण ११ याठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी ही केंद्रे चालवतील.

क्रिटीकल मतदान केंद्रे

पनवेल मधील १० मतदान केंद्र व उरण मधील ३ मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलींग स्टेशन म्हणुन निश्चित करण्यात आलेले आहेत. पनवेलच्या १० मतदान केंद्रांपैकी ७ खारघर मधील आहेत.

संवेदनशील ५

उरण भागातील गव्हाण येथील ५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

पुरेशी मतदान यंत्रे / वाहनांवर जीपीएस यंत्रणा

निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. एकूण राखीव यंत्रे मिळून बॅलेट युनिट्स २९१६, कंट्रोल युनिट्स १४५४, व्हीव्हीपॅट १५६८ असतील. ही मतदान यंत्रे ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉंनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे.

१३२ ठिकाणाहून वेब कास्टिंग

पनवेल मधील ५८, उरणमधील ३९, कर्जत मधील ३५ मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

५५९२ मतदान अधिकारी /प्रशिक्षण पूर्ण

पनवेल, कर्जत आणि उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर १ मतदान केंद्राध्यक्ष, १ प्रथम मतदान अधिकारी, २ इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रांसाठी १० टक्के राखीव मतदान अधिकारी मिळून एकूण ५५९२ मतदान अधिकारी कर्मचारी असतील.

पथकांची बारकाईने नजर

या मतदारसंघांमध्ये १३ स्थिर सर्व्हेक्षण पथके, २२ भरारी पथके, ४ व्हिडीओ सर्व्हेक्षण पथके, १८ सूक्ष्म निरीक्षक , १३५ झोनल अधिकारी असून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे