नंदुरबारमध्ये ६८ टक्के मतदान

1030

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार 

नंदुरबार लोकसभा निवडणुक 2019 अंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले.मतदारांनी अधिक तापमानाची पर्वा न करता उत्साहाने मतदान केले असून  प्राथमिक माहितीनुसार अंदाजे 68 टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्राप्त होईल.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत 66.75 टक्के मतदान झाले होते.
सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी ऊर्दु हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.त्यांनी त्यानंतर शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए. यांनी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्यासह दुपारनंतर मतदान केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.
 कॉंग्रेस चे उमेदवार के सी पडवी यांनी मतदान केल्यानंतर 
जिल्ह्यात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली.सकाळी 9 वाजेपर्यंत 8.80 टक्के, 11 वाजता 24.52 टक्के, दुपारी 1 वाजता 39.95 टक्के,3 वाजता 51.59 टक्के, 5 वाजता 62.02 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेनंतर मतदान केंद्रात रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान सुरू होते.
जिल्ह्यात विविध ठिकाणी सखी मतदान केंद्र सजविण्यात आले होते. दिव्यांग मतदारांना स्वयंसेवकांनी मतदानासाठी सहकार्य केले.शहादा येथील पार्थ संजय सोनार याने बोहल्यावर चढण्यापूर्वी हळदीच्या कार्यक्रमानंतर मतदान केले.दिव्यांग मतदारांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून आला. साक्री तालुक्यातील शिव येथे 104 वर्षाच्या महिला मतदार अनुबाई चौरे आणि शिरपूर येथे शंभरी गाठलेल्या जवत्राबाई तुकाराम चव्हाण  यांनी मतदान केले.
मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काही ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.काही ठिकाणी स्वयंसेवकांनी मतदारांना पिण्याचे पाणी वाटप करण्याचे काम केले. श्रॉफ हायस्कुल येथे सखी मतदान केंद्रावर सनई चौघड्याच्या स्वरात मतदारांचे स्वागत करण्यात आले.येथे मतदारांच्या स्वागतासाठी सुंदर कमानी सजविण्यात आल्या होत्या.युवा मतदारांनी सेल्फी पॉईंट्स आकर्षित करीत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात श्री.मंजुळे,अपर‍ जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे हे संपुर्ण निवडणूक प्रक्रीयेवर लक्ष देऊन होते. जिल्हाधिकारी मंजुळे हे सातत्याने सहाय्यक निवडणूकअधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.जिल्ह्यातील 215 मतदार केंद्रातून वेब कास्टींग करण्यात आले.नियंत्रण कक्षातील पडद्यावर या मतदान केंद्रातील हालचालींवर  लक्ष ठेवण्यात येत होते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रीया अधिक सुलभ झाल्याचे दिसून आले.