आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-बालाजी मंजुळे

653

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याच्यादृष्टीने प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तो जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी वान्मती सी.लक्ष्मीकांत साताळकर आदी उपस्थित होते.
श्री.मंजुळे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी.नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याची माहिती नागरिकांना देण्यात यावी.मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक सुस्थितीत ठेवावे.प्रत्येक तालुक्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेवून त्यादृष्टीने पूर्वतयारी करावी.
आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा.आरोग्य विभागाने पुरेसा आरोग्यसाठा तयार ठेवावा.नर्मदा किनाऱ्यावरील गावांशी संपर्क करण्यासाठी वायरलेस यंत्रणा तयार ठेवावी.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोंडाईबारी घाटातील दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सावऱ्यादिगर पुलाचे काम त्वरीत सुरू करावे,असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत विविध विभागांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
—–

टंचाई परिस्थितीत संवेदनशिलतेने कामे करा-जिल्हाधिकारी

नंदुरबार जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीत नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलतेने कामे करावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
श्री.मंजुळे म्हणाले, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांना गावातच कामे उपलब्ध करून देत कामासाठी स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामस्थांना मागणीनुसार काम उपलब्ध करून द्यावे.रोहयो अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. रोहयोच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. नळ पाणी पुरवठा योजनांची सुरू असलेली कामे 15 मे पर्यंत पुर्ण करण्यात यावीत. टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी यंत्रणेने तात्काळ प्रतिसाद द्यावा.अधिकाऱ्यांनी जलसंधारणासाठी सुरू असलेल्या श्रमदानात सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा, चाऱ्याची उपलब्धता, तळोदा तालुक्यात दुर्गम भागातील पाणी टंचाईचा यावेळी आढावा घेतला. जिल्ह्यात आवश्यकतेनुसार मुबलक चारा उत्पादन झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
‘गाळमुक्त धरण’आणि 50 कोटी वृक्ष लागवडीचा आढावा
श्री.मंजुळे यांनी यावेळी ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेच्या कामांचा आढावा घेतला. या उपक्रमाला चळवळीचे स्वरुप येण्यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व कामे सुरू करावीत. त्यासाठी आवश्यक जेसीबी यंत्र स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असल्यास त्याची माहिती घ्यावी.मंजूर असलेली 96 कामे 20 मे पर्यंत पुर्ण करावीत.वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावातील कामांना प्राधान्य देण्यात यावे,असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. सातपुडा डोंगररांग परिसरात अधिक वृक्ष लागवड करावी. लवृक्ष संवर्धनाकडेदेखील विशेष लक्ष द्यावे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.