खेड्यातील प्रगतीवरच भारताचे भवितव्य अवलंबून : डॉ. भूषण पटवर्धन

623

भारती विद्यापीठाचा ५५ वा वर्धापनदिन संपन्न 

मल्हार न्यूज(ऑनलाईन)

भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यातील प्रगतीवरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. हे जाणलेल्या भारती विद्यापीठाने ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान देऊन लोकशिक्षणाचे कामही केले आहे. असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी भारती विद्यापीठाच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिन समारंभात बोलताना व्यक्त केले. व्यासपीठावर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर, आमदार जयकुमार गोरे, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव उपस्थित होते. या समारंभात संस्थेतील गुणवंत, कला व क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनी, विशेष पुरस्कार प्राप्त अध्यापक-प्राध्यापक व संस्था सेवा गौरव पुरस्कारांचे वितरण आणि भारती विद्यापीठाचे मुखपत्र असलेल्या ‘विचारभारती’च्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. आई-बाप गुरुमाऊली लोकशिक्षण मंदिर, बार्शी यांच्या वतीने डॉ. पतंगराव कदम यांना मरणोत्तर आदर्श मातृभक्त गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य व. न. इंगळे यांच्या हस्ते डॉ. विश्वजित कदम यांनी तो स्वीकारला.
डॉ. पटवर्धन म्हणाले, “भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. असे चित्र अन्य स्वायत्त विद्यापीठात दिसत नाही. भारती विद्यापीठातर्फे प्रतिवर्षी काही कोटी रुपयांची गरजू विद्यार्थ्यांची फी माफ केली जाते. हा अनुभव इतर विद्यापीठात येत नाही. याला फी माफी म्हणण्याऐवजी डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती असे त्याचे नामकरण करावे. डॉ. पतंगराव यांचे व्यक्तिमत्त्व  हे एक अजब रसायन होते त्यांना विरोध करणार्यांनाही त्यांनी शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी मदत केली. पतंगरावांच्या बहुविध कार्याचा अभ्यास व्हावा यासाठी देशात आणि परदेशातील विद्यापीठातही त्यांच्या नावे अध्यासने सुरु व्हावीत यासाठी भारती विद्यापीठाने पुढाकार घ्यावा.
डॉ.  शिवाजीराव कदम म्हणाले, “प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया आहे. तो मजबूत असला पाहिजे. ग्रंथालयात आणि प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ थांबले पाहिजे. औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा अंतर्भाव शिक्षणात झाला पाहिजे. कौशल्ये असतील तरच विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध होतील. 
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, “आज शिक्षणक्षेत्र अनेक स्थित्यंतरातून जात आहे. स्पर्धेच्या युगात शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सतत अद्ययावत आणि सज्ज असणे जरुरीचे आहे. मानवतेची मूल्ये शिक्षणातून मुलांच्या मनात रुजली पाहिजेत. 
डॉ. एम. एस. सगरे यांनी आभार मानले. प्रा. राजेंद्र उत्तुरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.