सायबर क्राईमबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जागरूक करावे

605

पिंपरी । प्रतिनिधी :

सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून, त्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने तरुणाईमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता व सतर्कता निर्माण करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी पोलिसांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना याविषयी जागरुक करावे, असे आवाहन सायबर शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी केले.
             हिंजवडी येथील अकेमी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे सायबर क्राईम विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रकारे वाढणार्‍या सायबर क्राईमविषयी किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विभा बोके होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक बोके होते. जिमी पंडिता यांनी स्वागत, तर आभार डॉ. सचिन कुलकर्णी यांनी मानले. 
           सुनील पवार यांनी सांगितले, की सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात नागरिकांचे बहुतांश दैनंदिन व्यवहार संगणक, मोबाइल अ‍ॅप व सोशल मीडिया यांच्याशी जोडले गेले आहेत. ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन तिकिट बुकिंग यासारखे आर्थिक व्यवहार, तसेच वेगवेगळ्या इंटरनेट साईटवरून ऑनलाइन खरेदीचे व्यवहार करणार्‍यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. पोलिस स्टेशनच्या सहकार्याने आपापल्या शाळा, कॉलेजमध्ये मेळावे घ्यावेत व सायबर गुन्ह्यांविषयी माहिती द्यावी, अशा सूचनाही सुनिल पवार यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या. 
            एटीएम पासवर्ड मिळवून पैसे परस्पर काढून किंवा त्या कार्डद्वारे परस्पर खरेदी-विक्री करून फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. नायजेरियन नागरिकांकडून इंरटनेटव्दारे लॉटरी लागली आहे, गिफ्ट ऑफर आहे, परदेशात नोकरी लागली आहे, असे आमिष दाखवून बनावट खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडून जनतेची फसवणूक करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याचबरोबर मुलींचे बोगस फेसबुक अकाउंट बनवणे, अश्लील व्हिडिओ पाठवणे अशा गुन्ह्यांचीही नोंद आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी जागरूक राहावे, असेही सुनील पवार म्हणाले.