मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

990

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार लोकसभा निवडणुक 2019 अंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात होणार असून यासाठी आवश्यक तयारी पुर्ण करण्यात आली आहे.साधारण एक हजार अधिकारी-
कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी निवडणूक निरीक्षक शाहजान ए. आणि मतमोजणी निरीक्षक जॉकी ॲन्ग्यु यांचेसह मतमोजणी पूर्वतयारीचा आढावा घेतला.यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम,तहसीलदार दराडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक,मतमोजणी निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी कर्मचाऱ्यांची यादृच्छिक पद्धतीने(रँडमायझेशन) मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्ती करण्यात आली. मतमोजणी स्थळावर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.गुरुवार 23 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल.उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. नंदुरबार लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, शहादा,अक्कलकुवा, नवापूर,साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून क्रमाने मतमोजणीसाठी नेण्यात येतील.मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षा कडे असणार आहे.बाहेरील बाजूस एसआरपी आणि पोलीस बंदोबस्त राहील.
मतमोजणीसाठी सहा कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल.प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असतील. या प्रमाणे एका कक्षातील14 टेबलसाठी 20 पथके अर्थात 60 कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष देतील.
सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. टपाली मतमोजणी 8 आणि ईटीबीपीएस मतमोजणी 2 टेबलवर होणार आहे.दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल.प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येईल.एकूण 24 ते 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे. (नंदुरबार-27,शहादा-25, अक्कलकुवा-25, नवापूर-25,साक्री-27, आणि शिरपूर-24)
मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनधींना उपस्थित रहाता येईल, मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक असेल.
मतमोजणीची फेरीनिहाय माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेपक बसविण्यात आले आहे.‘वोटर्स हेल्पलाईन’ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मतमोजणीची माहिती मिळू शकेल.निवडणूक निरीक्षक शाहजान ए. आणि मतमोजणी निरीक्षक जॉकी ॲन्ग्यु मतमोजणीच्यावेळी उपस्थित रहाणार आहेत.

भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी

मतमोजणी प्रक्रीया सुरळीत पार पडावी व त्यात व्यत्यय येऊ नये यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भ्रमणध्वनी ठेवण्याची कुठलीही व्यवस्था मतमोजणीच्या ठिकाणी असणार नाही. मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनीचा उपयोग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे अधिकारी, कर्मचारी,उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी भ्रमणध्वनी किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.