कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतक-यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी -राज्यमंत्री विजय शिवतारे

611

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतक-यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार भिमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहगडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व पंचायत समिती सदस्या निर्मलाताई काळोखे, सुवर्णाताई शिंदे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.जी पलघडमल, कृषी अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकात भोर इ. मान्यवर उपस्थित होते.

            या बैठकीमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांनी जिल्ह्यातील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम 2018-19 सर्वसाधारण क्षेत्र व प्रेरणी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता खरीप हंगाम 2019 साठी बियाणे व रासायनिक खते नियोजन कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, खरीप रब्बी सन 2018-19 पीक कर्जवाटपाबाबतची माहिती, सन 2019-20 चे कर्जवाटपाचे नियोजन, शेती पंपांना वीजपुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना इ. कृषी विषयक योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांची तातडीने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

            यावेळी बोलताना  शिवतारे यांनी कृषी विभागामार्फत जे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे त्याची नियोजनानुसार अमंलबजावणी करावी, सध्या बियाणांची व खतांची उपलब्धता असून शेतक-यांच्या वीजजोडणी व इतर योजनांकरीता निधीची आवश्यकता असल्यास जिल्हाधिका-यांमार्फत शासनास प्रस्ताव सादर करावा. या निधीकरीता राज्यस्तरीय बैठकीत मा. मुख्यमंत्री यांचेकडून मंजूरी मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल, तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनुदानीत चारा छावण्यांमध्ये शेतक-यांची जनावरे घेण्याकरीता नाकारल्यास अशा शेतक-यांच्या तक्रारीवरून संबंधित संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच शेततळी प्लास्टीक पेपर चारा छावण्याबाबत तसेच नवीन विंधन विहीरींबाबतचे धोरण याविषयी आढावा घेतला.              

            यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यामध्ये चारा छावण्यांचे नऊ प्रस्तावांपैकी चार ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. तसेच नवीन प्रस्तावांना 24 तासात मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.

            यावेळी  दि. 25 मे ते 8 जून 2019 या कालावधीत रोहीणी नक्षत्राच्या मुहूर्तावर उन्नत शेती-समृध्द शेतकरी अभियान पंधरवडामध्ये कृषि विषयक योजनांची गावोगाव जनजागृती व प्रचार प्रसिध्दी मोहिमेचा शुभांरभ करण्यात आला. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. आभार कृषि विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी मानले.