शाळेत रोपवाटिका उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल -पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

523

मल्हार न्यूज, पुणे 

पर्यावरण मंत्रालय लवकरच देशभरातील शाळांमध्ये रोपवाटिका उपक्रम सुरू करणार असून यामध्ये शालेय विद्यार्थी बियाणे पेरतील,त्याची देखभाल करतील आणि वार्षिक निकालाच्या दिवशी हे रोपटे बक्षीस म्हणून स्वीकारतील असं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. या उपक्रमात स्थानिक वन विभाग आवश्यक सहकार्य पुरवेल. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला शालेय विद्यार्थी आणि रोपट्यांमध्ये एक कायमस्वरूपी नातं विकसित करायच आहे असं जावडेकर म्हणाले.
आज सुरू करण्यात आलेल्या #SelfieWithSapling अभियानाचा भाग म्हणून जावडेकर यांनी नवी दिल्लीत पर्यावरण मंत्रालयाच्या आवारात व्रूक्षारोपण केलं.यावेळी पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेव, हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा आणि ख्यातनाम गायिका मालिनी अवस्थी उपस्थित होते. या सर्वांनी पर्यावरण रक्षण आणि झाडे लावण्याचा महत्व विशद करणारा संदेश दिला. जावडेकर यांनी सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आणि रोपट्याबरोबर काढलेला सेल्फी समाज माध्यमावर टाकण्याचे आवाहन केले.

यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी लोक सहभाग हा अविभाज्य घटक असून पर्यावरण रक्षण ही लोक चळवळ व्हावी असं सांगितले. मनुष्याला जगण्यासाठी जेवढा ऑक्सिजन आवश्यक आहे, त्यासाठी त्याने संपूर्ण आयुष्यात किमान ८ ते १० झाडे लावावीत यावर त्यांनी भर दिला.
देशात हजारो किलोमीटर पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला १२५ कोटी झाडे लावण्याच्या संकल्पाप्रति केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वचनबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली.
जागतिक पर्यावरण दिन जगभरातील सर्व सरकारे, उद्योग, समाज आणि नागरिकांना शहरे आणि प्रांतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीकरणीय उर्जा, हरित तंत्रज्ञानाच्या नव्या संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळते. दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद चीन भूषवत असून वायू प्रदूषण ही यंदाची संकल्पना आहे. सध्या वायू प्रदूषण हा पर्यावरण दृष्ट्या आरोग्याला सर्वात मोठा धोका आहे. हवेतील प्रदूषणकारी घटक पक्षाघात, श्वसन रोग आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणार्या सुमारे एक त्रुतीयांश म्रुत्यूला तसंच ह्रुदयरोगाच्या झटक्यामुळे होणार्या एक चतुर्थांश म्रूत्यूला जबाबदार असतात. भारताने गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषवलं होतं, तेव्हा प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यावर भर देण्यात आला होता.
वायू प्रदूषणाबाबत काही तथ्ये
• जगातील ९२ टक्के लोक स्वच्छ हवेत श्वास घेत नाहीत
• वायू प्रदूषणामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेवर ५ ट्रिलियन डॉलर्सचा भार पडतो.
• २०३० पर्यंत पीक उत्पादनात २६ टक्के घट होण्याचा अंदाज
भारताने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम सुरू केला आहे. हे दीर्घकालीन राष्ट्रीय धोरण आहे. वायू प्रदूषण रोखणे आणि हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणं हा यामागचा उद्देश आहे.

MC/IJ/SK