जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल

853

नाशिक,

तक्रारदार यांच्या वेतनात ऑक्टोबर २०१८ पासूनचे वेतनवाढ लावण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नथ्थूजी डेकाटे यांनी २०००० हजार रुपयांची लाचेची मागणी करून १०,००० हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांच्या विरुद्ध  भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजी.नं. ५७७/२०१९ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (संशोधन सन २०१८ ) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार , यातील तक्रारदार यांचे ऑक्टोबर २०१८ पासूनचे वेतनवाढ लावण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नथ्थूजी डेकाटे यांनी २०००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.पण तक्रारदार यांची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या  तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याने त्याप्रमाने कारवाई करून तक्रारदाराकडून २०,००० हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १०,००० हजार रुपयांची लाच घेताना निष्पन्न झाल्याने  नाशिक जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नथ्थूजी डेकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.

   सदरची कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.