21 जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचा जिल्‍हा स्‍तरीय मुख्‍य कार्यक्रम- डॉ. कटारे

853

पुणे–   येत्‍या 21 जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचा जिल्‍हा स्‍तरीय मुख्‍य कार्यक्रम पुण्‍यातील बी.जे. मेडीकल महाविद्यालयाच्‍या मैदानावर होणार असल्‍याचे निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले. पोलीस मुख्‍यालयाजवळील मैदानावर सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवर आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या पूर्वतयारीची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी क्रीडा उप संचालक अनिल चोरमले, जिल्‍हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसिलदार प्रशांत आवटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

            निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. कटारे यांनी योगाबाबतची जनजागृती होण्‍यासाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍याची सूचना केली. जिल्‍ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनीही योग दिन साजरा करावा, असेही त्‍यांनी सांगितले. योगाचा प्रचार आणि प्रसार तसेच जनजागृती होण्‍यासाठी शैक्षणिक संस्‍था, शाळांमध्‍ये उपक्रम राबविण्‍यात यावेत. जिल्‍हास्‍तरावरील कार्यक्रमात जनसामान्‍यांनाही सहभागी करुन घेण्‍यात यावे, असेही त्‍यांनी सांगितले.

            तालुका स्‍तरावरही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार असून सर्वांनी त्‍यात सहभागी व्‍हावे, असे आवाहन क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले.