एमटीडीसीकडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन

760

पुणे : पालखीसोहळा’ ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. पालखी म्हटलं कि सगळीकडेच वारकरी, टाळ – मृदुगांचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते.  या नयनरम्य अशा पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी येतात. या आषाढी वारीसाठी , विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी वारीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात. या पालखी सोहळ्यातून अध्यात्मिक, अनुभवात्मक पर्यटन वाढावे या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून यावर्षी आषाढी वारी सहलीचे  आयोजित करण्यात आले आहे. वारीमधील आगळावेगळा सोहळा तसेच वारकरी बांधवांना अनुभवास येणारी अध्यात्मिक अनुभूती शहरी माणसांना देखील अनुभवण्यास मिळावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मार्फत गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वारी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थपक चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिली.

            सहली दरम्यान दिंडीसोबत चालण्याचा तसेच दिंडीच्या दिनक्रमाचा अनुभव सहभागी पर्यंटकांना मिळणार आहे. प्रादेशिक कार्यालयाचे दिपक हरणे, श्रीमती स्नेहल काळे, जयंत डोफे आणि पांडुरंग तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

       1 ते 2 जुलै या कालावधीत पळशी ते उंडवडे येथे 2 दिवस व एक रात्र या टप्यातील सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोणंद ते तरडगाव या एक दिवसाच्या सहलीचे 3 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. फलटण ते वाखरी 2 दिवस व एक रात्रीची सहल 9 ते 10 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. वारी सहलीचे नियोजन करण्यात आले. पर्यटकांनी वारी दर्शन सहलीच्या आरक्षणासाठी एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय, सेंट्रल बिल्डींग, ससून हॉस्पिटलसमोर, पुणे येथे किंवा 020-26126867 किंवा 020-26128169 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.