दाहक सामाजिक वास्तव ‘आर्टिकल १५’

835

भूपाल पंडित, पुणे

भारतीय संविधानातील कलम-१५ नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपट ‘आर्टिकल १५’ या चित्रपटात भारतीय संविधानातील याच कलम-१५ ची मांडणी केलेली आहे. या चित्रपटात अनेक संवेदनशील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आर्टिकल १५’ ची कथा ही चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काल्पनिक असली तरी यामध्ये दाखवलेल्या विविध घटना या आपल्या आजूबाजूला सातत्याने घडणार्या आहेत.
युवा आयपीएस अधिकारी अयान रंजन ( आयुष्मान खुराणा) याची उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागात बदली होते. तो अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होतो त्या लालगाव मध्ये तीन दलित मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते. पोलीस तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. एकेदिवशी त्यातल्या दोघींचे मृतदेह एका झाडाला लटकावलेली सापडतात. कनिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात की त्या मुलींचे आपापसात समलैंगिक संबंध असल्यानं त्यांच्या वडीलांनीच त्यांची हत्त्या केली आहे. त्या दृष्टीने तपास करून दोघींच्या वडिलांना अटक केली जाते, त्यांच्याकडून तसा जबाबही मिळवला जातो. तिसर्याक बेपत्ता मुलीचा तपास करण्याची गरजही या कनिष्ठ अधिकार्यांजना वाटत नाही. अयान रंजन मात्र याच्या तपशीलात जातो तेव्हा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सामुहीक बलात्कार आणि निर्घृण हत्त्या झाले असल्याचे आढळते. हा रिपोर्ट राजकीय दबावातून बदलला जातो. त्या तिसर्या मुलीचे काय होते? अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते? राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होते का? हे जाणून घेण्यासाठी ‘आर्टिकल १५’ बघायालाच हवा.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘मुल्क’ नंतर पुन्हा एकदा संवेदनशील विषयाला हात घातला आहे. बलात्कार, हत्या, समाजव्यवस्था, सामाजिक घटक आणि जातीव्यवस्था यांचा आधार घेत उत्तर भारतातील एका खेड्यातील हे कथानक आहे. आपण आपल्याच भावविश्वात रममाण होत जीवन जगतोय खरे पण, त्याचवेळी देशात असंख्य ठिकाणी, असंख्य गुन्हेही घडत असतात. कोणाचा जीव धोक्यात असतो, कोणाच्या अब्रूची हेळसांड होत असते, कोणाला तरी वेठीस धरले जाते, कोणाला तरी वासनेचे शिकार बनवले जाते, कोणाची असंख्य स्वप्न तुटत असतात आणि कोणावर तरी अत्याचार होत असतात या वास्तवाची झळ लागल्यावाचून राहत नाही.
” हम कभी हरिजन हो जाते है… कभी बहुजन हो जाते है…. बस जन नही बन पा रहे… की जन गण मन मै हमारी भी गिनती हो जाये” किंवा ‘’ ये तीन लडकिया अपनी दिहाडी मे… सिर्फ तीन रुपये बढाकार मांग रही थी … ३ रुपये… जो आप मिनरल वॉटर पी रहे है…. उसके दो या तीन घुंट के बराबर… उनकी इस गलती की वजह से उनका रेप हो गया सर… उनको मार कर पेड पे टांग दिया गया… ताकी पुरी जाती को उनकी औकात याद रहे’’ अशा संवादातून आजही समाजात असलेल्या विषमतेची दाहकता लक्षात येते.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता आणि मोहम्मद झीशान अयुब यांचा अभिनय हा अफलातून अनुभव देणारा आहे. संगीत, पार्श्वसंगीत उत्तम आहे. कॅमेरावर्क जबरदस्त आहे.
आर्टीकल १५ हा. एक क्राईम थ्रिलर वाटणारा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्याण पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. दिग्दर्शन, अभिनय, संवाद, पटकथा, चित्रानुभव आणि परिणामकारकता यांच्याबाबतीत हा चित्रपट खूपच सरस आहे. भंवरीदेवी, खैरलांजी, कोपर्डीसारख्या अनेक जातीय भेदभावाच्या बलात्काराच्या घटना समोर येतात. तर मंदिरात जेवण केले फक्त या संशयाच्या कारणावरून दलितांना नग्न करून हाडाची काडं होईपर्यंत मारणे हे समाजाचे भयानक वास्तव हा चित्रपट समोर आणते.

 

निर्मितीझी स्टुडीओ, अनुभव सिन्हा

संगीतपियुष शंकर, अनुराग, डेवीन पारकर

कलाकार – आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता, मोहम्मद झीशान अयुब

रेटिंग – ****

– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com