वादळी वाऱ्याने सलग दोनवेळा नुकसान; कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी

531

संकटात सापडलेला शेतकरी भरपाई पासून वंचित

पुणे : प्रतिनिधी     

बकोरी (ता. हवेली) येथे गेल्या वर्षी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे पॉलीहाऊस उडून गेल्यामुळे गुलाब फुलांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाची संबधित तलाठी, कृषी विभागाकडून पाहणी करून पंचनामा देखील करण्यात आला होता. दुर्दैवाने याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेली एक वर्षापासून नुकसान भरपाई मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवून सुद्धा भरपाई मिळत नसल्यामुळे  आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच आर्थिक हातघाईस आलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी उदासीन असल्याचे दिसून येते.  नुकसानग्रस्त पॉलिहाऊसची पाहणी करतांना तलाठी, कृषी अधिकारी

बकोरी येथील शेतकरी तिरसिंग सोनबा वारघडे यांनी कर्ज काढून डच जातीच्या गुलाब शेती सुरु केली. त्यासाठी त्यांनी पॉलिहाऊस उभारले. अतिशय कष्टाने सुरु केलेल्या गुलाब व्यवसाय जोमात येताच निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि पॉलिहाऊस उडून गेल्यामुळे गुलाबाचे मोठे नुकसान झाले. आधीच कर्जात बुडाल्यामुळे आणि त्यातच निसर्गाची अवकृपा यामुळे चिंताग्रस्त झाला आहे. लाखो रुपयांची झालेली हानी भरून निघणे शक्य नसल्यामुळे वारघडे यांच्या कुटुंबीयावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

गेल्या वर्षी नुकसानग्रस्त पॉलिहाऊस, गुलाब शेतीची तलाठी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला होता. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. वारघडे यांनी वारंवार जिल्हाधिकारी, कृषी विभागासह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले मात्र जगाच्या पोशिंद्याला अद्यापही मिळाली नाही. लोकप्रतिनिधींनी मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन हवेतच विरले. निसर्ग, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कचाट्यात अडकलेले वारघडे कुटुंब आर्थिक संकटात सापडल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहे. तिरसिंग वारघडे यांनी बँककडून कर्ज काढून गुलाब शेती व्यवसाय सुरु केला. संबंधित बँकने विमा काढला नसल्यामुळे पंचनामा करून देखील भरपाई मिळणार नसल्याचे दिसून येते. गेली एक वर्षापासून अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आज ना उद्या काही मदत मिळेल या आशेपोटी वाट पाहत असतांना याही वर्षी निसर्गाची अवकृपा झाली आणि वादळी वाऱ्याने राहिले तेही गेले. त्यामुळे वारघडे कुटुंब पूर्णतः खचले आहे. मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या वारघडे कुटुंबीयावर उपासमारीची पाळी आली आहे.