चिखल तुडवत करावा लागतो ग्राहकांना बाजार

805

वाघोली, पुणे प्रतिनिधी

वाघोली येथे बाजारतळमध्ये परिसरातील सर्वात मोठा बाजार भरतो. बाजाराला पंचक्रोशीतील भाजीपाला विक्रेत्यांसह छोटेमोठे व्यापारी हजेरी लावतात. मात्र बाजार भरतो तो परिसर अतिशय चिखलमय, दुर्गंधीयुक्त झाला आहे. व्यापारी व ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

                 वाघोली गाव हे मध्यवर्ती ठिकाण असून बाजारतळ येथे पूर्वीपासून मोठा बाजार भरतो. दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही कल वाढला आहे. सकाळी, सायंकाळी शेतकरी भाजीपाला व अन्य माल विक्रीसाठी आणतात. भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. रोजचा भाजीपाला व माल विक्रेत्यांना सद्यस्थितीत तात्पुरते शेड उभारून देण्यात आले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात शेडचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे व्यापारी, शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होते. माल खराब होऊ नये आणि ग्राहकांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतकडून अत्याधुनिक शेडसाठी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून काम सुरु आहे. शेडचे काम होईल तेंव्हा होईल परंतु सद्यस्थितीत बाजारतळमध्ये चिखल, कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, एका बाजूचे पाणी महामार्गाच्या खालून पाईपद्वारे बाजार भरतो त्याठिकाणी काढून देण्यात आल्यामुळे अजूनच झालेली दुरावस्था यामुळे शेतकरी व्यापारी, ग्राहक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुविधांचा अभाव :

बाजार लिलाव १ कोटी २८ लाखामध्ये गेला आहे. यामध्ये दैनंदिन ५० लाख तर आठवडे बाजार ७८ लाख असा एकूण १ कोटी २८ लाख रुपयेलिलावातून ग्रामपंचायतीला मिळाले असतांना सुविधांबाबत दुर्लक्ष केले जात आहे. पाणी, स्वच्छतागृह, लाईट आदि मुलभूत सुविधा नसल्यामुळे मोठी कुचंबना होत आहे. बाजाराचा लिलाव कोटीच्यावर गेला असतांना देखील सुविधांचा अभाव आहे.

सद्य स्थितीत बाजारतळेमधून वाहत असलेले पाणी बंद करण्यासाठी लवकरच पाईप टाकून पुढे ते ड्रेनेजला जोडण्यात येणार आहेत – मधुकर दाते (ग्रामविकास अधिकारी, वाघोली)