प्रेरणादायी प्रवास ‘सुपर 30’

2138

भूपाल पंडित, पुणे

बॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक्च पीक जोमात आहे. अभिनेता हृतिक रोशनचा बहुप्रतीक्षित ‘सुपर 30’ हा चित्रपट बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारलेला आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनाचे गणित ठीकठाक सोडवण्यात यशस्वी ठरला आहे.

‘सुपर 30’ हा एका सामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थी आनंद कुमार (हृतिक रोशन) याची कथा आहे. त्याला इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात अॅडमिशन मिळत असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला तिथे प्रवेश घेता येत नाही. त्याच दरम्यान आनंदच्या  वडिलांचं निधन होतं. मग उदरनिर्वाह करण्यासाठी आनंद कुमारला पापड विकावे लागतात. पापड विकत असताना एकेदिवशी त्याची भेट पटनामधील एक्सलन्स कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या लल्लन सिंग (आदित्य श्रीवास्तव)सोबत होते. लल्लन सिंग आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये आनंद कुमारला शिकवण्यासाठी सांगतो. आनंद कुमारची कोचिंग क्लासेसमध्ये शिकविता शिकविता आर्थिक परिस्थितीदेखील सुधारते. मात्र एक दिवस त्याला जाणीव होते की आपण फक्त श्रीमंत मुलांना अर्थात राजाच्या मुलांना राजा बनवण्याच्या मागे लागलो आहोत. तो क्लासा मधील नोकरी सोडतो आणि आर्थिक मागासलेल्या व वंचित अशा तीस मुलांना मोफत आयआयटी परीक्षेसाठी तयार करण्यासाठी क्लासेस काढतो. त्याच्या या निर्णयात त्यांचा भाऊ प्रणव कुमार (नंदीश सिंग) त्याला सहकार्य करतो. क्लासची नोकरी सोडल्यामुळे त्याची प्रेयसी रितु (मृणाल ठाकूर) त्याला सोडून निघून जाते. आनंद कुमारच्या खडतर प्रवासात असंख्य अडचणी निर्माण होतात, तो या सर्व अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी ‘सुपर 30’ हा चित्रपट बघायला हवा.

दिग्दर्शक विकास बहल याचे ‘क्वीन’ वगळता इतर चित्रपट फार काही चर्चेत नव्हते, यामुळे आनंद कुमार यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे दारिद्रय़रेषेखाली असणाऱया मुलांना घडवायला उचललेलं शिवधनुष्य आणि त्याची ही गोष्ट तो कशी मांडणार याची उत्सुकता होती, मात्र अपेक्षापूर्ती करण्यात तो अपयशी ठरला आहे. चित्रपटाचा विषय उत्तम आहे मात्र पटकथा टिपिकल हिंदी चित्रपटाच्या वळणावर तो घेऊन गेला आहे. रितूचे आनंदला सोडून जाणे किंवा लल्लनने घडवून आणलेला हल्ला अशा अनेक बाबी या चित्रपटाला टिपिकल बनवतात. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’असे काही संवाद दाद मिळवून जातात.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अभिनेता हृतिक रोशनने आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा अगदी उत्कृष्टरीत्या उभी केली आहे. आपलं ग्लॅमर, देखणं रूप सगळं बाजूला ठेवून त्याने काम केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या वाट्याला फारसं काम नाही. वीरेंद्र सक्सेना, नंदीश संधू, आदित्य श्रीवास्तव यांनी आपल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी छोट्या भूमिकेतही आपली छाप सोडली आहे.

अजय – अतुलचे संगीत चांगले आहे, चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरने कॅमेऱ्यातून क्षण उत्तमरित्या टिपले आहेत. \थोडक्यात सांगायचे तर एका सामान्य गणिततज्ज्ञाचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे, मात्र काही टिपिकल गोष्टी टाळल्या असत्या तर चित्रपट अधिक प्रभावी झाला असता यात शंका नाही.

चित्रपट – सुपर 30

निर्मिती – नाडियादवाला ग्रॅण्डसन फिल्म्स, फँटम फिल्म्स, रिलायन्स एन्टरटेन्मेंट

दिग्दर्शक – विकास बहल

संगीत – अजय अतुल

कलाकार – हृतिक रोशन, मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, पंकज त्रिपाठी, नंदिश सिंग

रेटींग – ***

–    भूपाल पंडित

pbhupal358@gmail.com