‘हिमालयाची सावली’ नाट्य रसिकांच्या भेटीला

572

दिग्दर्शक राजेश देशपांडे व निर्माते गोविंद चव्हाण, प्रकाश देसाई, सुभाष रेडेकर यांची नाट्यरसिकांना अनोखी भेट

मल्हार न्यूज, पुणे 

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या हिमालयाची सावलीया दर्जेदार अभिजात नाट्यकलाकृतीचा आस्वाद नाट्यरसिकांना लवकरच घेता येणार आहे. आजवर अनेक सकस अशा नाट्यकलाकृती प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे.

प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर येणारे हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस निर्माता व दिग्दर्शकांचा आहे. प्रा. वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. रविवार २९ सप्टेंबरला नाशिक येथील कालिदास’ नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.

या नाटकाच्या नव्या संचाबद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात की, ‘‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. कानेटकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अभिजात कलाकृती पुन्हा पहायला मिळणे हे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांसाठी स्मरणरंजन असेल तर नव्या पिढीला जुन्या कलाकृतींचे सामर्थ्य यामुळे लक्षात येईल’’ असे राजेश देशपांडे सांगतात.

नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून  त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर आदि कलाकार या नाटकामध्ये दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगला केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं अशा आशयाच हे नाटक जुन्या-नव्या पिढीसाठी ही नाटय़ मेजवानी असेल हे नक्की.