‘अभियांत्रिकी  व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शनाचे’ आयोजन

550

मल्हार न्यूज,पुणे,    

कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून  देशाचा शाश्वत विकास शक्य आहे, असे सांगत विद्यार्थी  व पालकांनी क्रमिक शिक्षणाप्रमाणेच कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे असे मत, पुणे जिल्हा  कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या  सहाय्यक  संचालिका अनुपमा पवार यांनी व्यक्त केले. 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त  ‘यशस्वी’ संस्थेच्या  विद्यार्थ्याचे ‘अभियांत्रिकी  व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शनाचे’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रदर्शनाची  पाहणी केल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यानी खूप नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून बनविलेले प्रकल्प नक्कीच वास्तवात येण्यायोग्य आहेत. आपल्या भवताली असणाऱ्या  प्रदूषण, वीजेचा  तुटवडा, वाहतूक समस्या यांचा विचार करून  आग विझवण्यासाठी, आगीतून लोकांची सुटका करण्यासाठी रोबोचा वापर,  वर्दळीच्या ठिकाणच्या जिन्यावरील पायऱ्यांच्या  माध्यमातून वीज निर्मिती, टाकाऊ पाणीप्रवाहाच्या मार्गाद्वारे वीज निर्मिती, घरात कोणीही नसताना  सेन्सरद्वारे  वीज बंद करून वीज बचत,सौर ऊर्जेचा वापराद्वारे गाडी धुतली जाणे,सौर उर्जेवर चालणारे कीटकनाशक फवारणी यंत्र, टाकाऊ प्लस्टिक बाटल्यातून पेन स्टॅन्ड  अशा  विविध वस्तूंची विद्यार्थ्यानी केलेली निर्मिती ही  निश्चितच कौतुकास्पद आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत तसेच लवकरच शासनाच्यावचातीने घेण्यात येणाऱ्या जिल्हा व्यवसाय कल्पना स्पर्धेतही  विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी  केले.      

या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन त्यांचा  गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या  समारोप सत्रात  भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मेंटॉरिंग इंडिया प्रकल्पाचे संचालक सचिन अडसरे  यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना  सांगितले कि, तुमच्याकडे  कौशल्य असल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे  होण्यासाठी  स्वयंरोजगाराचा  मार्ग कसा  निवडता येईल यादृष्टीने प्रयत्न करा, यासाठी   आवश्यक ते सर्व  सहकार्य, मार्गदर्शन  बीवायएसटी तर्फे करण्यात  येईल असे आश्वासन दिले.  उद्दिष्ट म्हणजेच ध्येय निश्चिती, ज्ञान किंवा कौशल्य आणि कष्ट करण्याची मानसिकता या तीन गोष्टींमुळेच  यशस्वी बनता येते असा  मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्याना  दिला. 

यावेळी कार्यक्रमाला  बीवायएसटीचे समन्वयक मोहनीश वाघ,  ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’च्या  संचालिका  स्मिता  धुमाळ, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता  पाटील, ‘यशस्वी’च्या ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा सावंत, मार्केटिंग विभाग प्रमुख अमृता तेंडुलकर  यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र शेळके, ईशा पाठक, निसार शेख,श्रीकांत  तिकोने, शाम वायचळ ,प्राची राऊत, शमिका तांबे, सचिन कुंभारकर,हर्षा पटेल, श्वेता साळी, अश्विनी घनवट, रश्मी शिंदे, गंगाधर डुकरे,निखिल चव्हाण व अजिंक्य गायकवाड   आदींनी  विशेष  सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.