भारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान -कामगार राज्यमंत्री भेगडे

644

प्रतिभा चौधरी,पुणे 

 १३ जुलै  २०१९ : नॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ पेर्सोनेल  मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पुणे विभागाच्या वतीने मराठा चेंबर्स  ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित  करण्यात आलेल्या  मनुष्यबळ  व्यवस्थापकांशी  परिसंवाद  कार्यक्रमात  बोलताना  राज्याचे कामगार राज्यमंत्री  संजय (बाळा) भेगडे  म्हणाले कि,   भारताच्या  एकूण  औद्योगिक विकासात  पुणे  जिल्ह्याचे  भरीव योगदान  असून  जिल्ह्यात औद्योगिक शांतता  नांदण्याच्या दृष्टीने  कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून  आपण योग्य ती जबाबदारी  पार पाडू  व कोणत्याही प्रसंगाला  किंवा औद्योगिक क्षेत्राला  अडचण  येऊ नये यासाठी  खंबीरपणे  उद्योगक्षेत्रासोबत उभे असल्याचे आश्वासन  दिले. तसेच मनुष्यबळ  व्यवस्थापकांच्या विविध  तक्रारी व अडचणी  यावेळी त्यांनी समजून घेतल्या व त्यावर शासन दरबारी सर्व प्रकारांचा सखोल  अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. कारखाना  कायद्यातील जाचक तरतुदींबद्दल  मनुष्यबळ  व्यवस्थापकांनी  उपस्थित  केलेल्या प्रश्नांवर  त्यांनी सकारात्मक चर्चा केली.  

याप्रसंगी  पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त  विकास पनवेलकर, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी, एनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष  कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, लेबर  लॉ प्रॅक्टिशनर्स  असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. आदित्य  जोशी, व्हायब्रंट  एच आर चे अध्यक्ष  शंकर  साळुंखे, ओएचआर चे प्रशांत  इथापे  आदी  उपस्थित  होते. 

यावेळी बोलताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी यांनी सांगितले कि, मनुष्यबळ  व्यवस्थापकांना  राष्ट्रीय दर्जा  प्राप्त होण्यासाठी  एनआयपीएमच्यावतीने  एक चळवळ  उभी राहत असून यात  सर्वांनी  सहभागी  होण्याचे त्यांनी  आवाहन केले.औद्योगिक क्षेत्रात पुणे जिल्हा देशात अव्वल  असून या  जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाकडे  कामगार  राज्यमंत्रीपदाची  जबाबदारी आल्याने या भागातील  औद्योगिक क्षेत्रातील  समस्या, प्रश्न  लवकर निकाली निघतील, तसेच  जिल्ह्यात औद्योगिक शांतता निर्माण होईल असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. 
यावेळी संजय (बाळा ) भेगडे यांचा कामगार राज्यमंत्रीपदी नियुक्ती  झाल्याबद्दल पुणेरी पगडी, उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या  कार्यकारी  समिती  सदस्य  हेमांगी  धोकटे यांनी आभार प्रदर्शन एनआयपीएमचे  सचिव नरेंद्र  पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश  रांगणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला  पुणे जिल्ह्यातील विविध  औद्योगिक कंपन्यांचे  मनुष्यबळ  व्यवस्थापक  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.