कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

565

पुणे :

अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय देण्याचे काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम्, अपर आयुक्त सुभाष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड रामनाथ पोकळे, निवृत्त सनदी अधिकारी पद्माकर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, अर्धन्यायिक कामकाज हा शासनाच्या कामाचा महत्वाचा भाग आहे. हे कामकाज करताना अनेक चुका वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणत्याही प्रकरणाचा निकाल देताना उच्चन्यायालाने त्यासंबंधी दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे अवलोकन करून मगच त्यावर निकाल देणे अपेक्षीत आहे. कायद्यामध्ये वारंवार बदल होत असतात, या कायद्यांमधील बदलांचा निरंतर अभ्यास करणे अपेक्षीत आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारणाचा निकाल दीर्घकाळ राखीव न ठेवण्याच्या सूचना देत डॉ. म्हैसेकर म्हणाले, या प्रकरणातील निकालांचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्धन्यायिक प्रकरणात न्यायदानाचे काम करत असताना वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यासाठी प्रयत्न करावा. कामकाज करताना तंत्रज्ञानाची मदत जरूर घ्यावी, मात्र त्यामध्ये काही चूका राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या अधिनस्त कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता, न्याय दंडाधिकाऱ्यांनी कायद्याच्या सर्व बाजू तपासून निकाल देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् म्हणाले, ज्ञान मिळविणे ही निरंतर प्रक्रीया आहे, ही प्रक्रीया प्रत्येक अधिकाऱ्यांनी कायम सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. कोणतेही काम करत असताना त्याचा मूळ ढाचा पक्का करण्यावर भर देणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेले ज्ञान आपण आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल कोल्हापूरचे पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला, तसेच महसूल विभागाच्या संवर्ग पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी संगिता राजापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आज हद्दपार विषयक कामकाज या विषयावर निवृत्त सनदी अधिकारी पद्माकर गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सन 2014 ते 2019 राज्य शासनाकडून एमएलआरसी/टेनन्सी अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा/धोरण/निर्णय या विषयावर सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले मार्गदर्शन करणार आहेत. तर दुपारच्या सत्रात केंद्र शासनाचे कृषि व पशुसंवर्धन विषयक धोरण व कृषि उत्पन्न वाढ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात कृषी आयुक्त सुहास दिवसे, सांगली जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेला सातारा‍ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सोलापूरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
****