बाटला हाऊस’ चकमकी पलीकडची गोष्ट

1682

भूपाल पंडित, पुणे 

बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून बायोपिक, वास्तव घटना यावर आधारित चित्रपटांची चलती सुरु आहे. एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास जसा लोकांना आवडतो तसेच काही महत्वपूर्ण घटना जाणून घेण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. निखील अडवाणी दिग्दर्शित जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा दहा वर्षापूर्वीच्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे.

‘बाटला हाऊस’ ची कथा १३ सप्टेबर २००८ मध्ये सुरु होते. दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्पोटाचा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडे सोपवण्यात येतो. या स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर केके (रवी किशन) आणि एसीपी संजय कुमार (जॉन अब्राहम) आपल्या टीमसह बाटला हाऊस एल-१८ इमारतीत पोहोचतात. तिथे पोलिसांची इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्यांसोबत चकमक होते. या चकमकित दोन संशयितांचा मृत्यू होतो. तसेच पोलिस ऑफिसर केके या हल्ल्यात शहीद होतात. एक अतिरेकी मात्र यावेळी पळण्यात यशस्वी होतो. वेगवेगळ्या सामाजिकराजकीय पक्षविविध संघटनांकडून संजय आणि त्याच्या टीमवर महाविद्यालयातील निर्दोष विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे गंभीर आरोप केले जातात. या कठीण प्रसंगी संजीवला बाहेरच्या कमी आपल्या खात्यामधील अंतर्गत राजकारणाचाच जास्त त्रास होतो. या सगळ्यामुळे व्यथित झालेला संजय पोस्ट ट्रॉमेटिक डिसॉर्डरसारख्या मानसिक आजाराने त्रस्त होतो. या कठीण प्रसंगात न्यूज अँकर असलेली त्याची बायको नंदिता कुमार (मृणाल ठाकूर) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आता हा सगळा चक्रव्यूह संजयकुमार कसा भेदतो आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता तो कशी करतो या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बाटला हाऊस’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.

बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण सर्व दृष्टीकोनातून दाखवण्यात दिग्दर्शक निखील अडवाणी यशस्वी ठरले आहेत. एका दहशतवाद्याला मारण्यासाठी सरकार जी रक्कम देतेत्यापेक्षा जास्त एक ट्रॅफिक पोलीस आठवड्याभरात कमावू शकतो,’ असे अनेक पैसावसूल संवाद या चित्रपटात आहेत. आपले प्राण धोक्यात घालून देशासाठी काम करणाऱ्या पोलिसांची बाजूही या चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आली आहे. प्रत्येक घटनेचे विविध पैलू मांडत या चित्रपटाची कथा पुढे सरकत राहते. याचे श्रेय दिग्दर्शक निखिल आडवाणीला जातं. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात पोलिसांचं धाडसराजकारणमानवाधिकार संघटनांचा आक्रोशधार्मिक कट्टरताप्रसारमाध्यम आणि तणाव या सर्व गोष्टी अधोरेखित करण्यात आल्यात. चित्रपटात दिग्विजय सिंहअरविंद केजरीवालअमर सिंह आणि लालकृष्ण आडवाणी यांसारख्या नेत्यांचे रिअल फुटेज वापरण्यात आलं आहे.

या चित्रपटात फक्त पोलिसांचं गुणगान गायलं नाहीकिंवा त्यांची प्रतीमा खराब होईल असंही काही दाखवण्यात आलेलं नाही. जे सत्य आहेत तिच नेमकी बाजू मांडण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे.दिग्दर्शकाने चित्रपटाला पूर्णपणे वास्तवदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण बऱ्याच ठिकाणी याचा अतिरेक झालेला आहे यामुळे चित्रपट थोडा संथ होतो. पण शेवटच्या काही मिनिटात असलेल्याकोर्ट रुम ड्रामामुले गाडी पुन्हा रुळावर येते.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर पोलिस ऑफिसर संजयकुमाच्या भूमिकेत जॉन अब्राहमने मस्त काम केलं आहे. या भूमिकेसाठी छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास जॉनने केल्याचे दिसते. प्रत्येक भूमिका त्याच ताकदीने करु शकतो हे जॉनने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मृणाल ठाकूरनेही नंदिता कुमारच्या भूमिकेत आपली छाप सोडली. ऑफिसवर केकेच्या भूमिकेत रवी किशनला जास्त काम नसलं तरी छोट्या भूमिकेतही तो लक्षात राहतो.

चित्रपटातील नोरा फतेहीचे आयटम नंबर साकी साकी’ लक्षात राहते. चित्रपटाचे छायांकनही उत्तम झालेले आहे. ‘बाटला हाऊस’ बद्दल एकंदरीत सांगायचे तर निखिल आडवाणीच्या कसलेल्या दिग्दर्शनानं हा सत्य घटनेवरील चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. जर तुम्ही जॉनचे चाहते असाल, तुम्हाला सत्यघटनेवर आधारित चित्रपटांची आवड असेल तर ‘बाटला हाऊस’ चा थरार नक्की अनुभवू शकता.

चित्रपट – बाटला हाऊस

निर्मिती – दिव्या खोसला कुमार, जॉन अब्राहम, कृष्णकुमार

दिग्दर्शक – निखील अडवाणी

संगीत – रोचक कोहली, तनिष बागची, अंकित तिवारी

कलाकार – जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, रवी किशन

रेटिंग – ***