प्रतिभा चौधरी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे देशवासियांशी संवाद साधला आहे. आपण त्यांचा मराठी अनुवाद पाहू यात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
आपल्या देशात सध्या एकीकडे पावसाळ्याचा आनंद लुटत आहोत, तर दुसरीकडे भारतात प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठला ना कुठलातरी उत्सव आणि जत्रा सुरु आहे, दिवाळीपर्यंत हे असेच सुरु असते आणि आपल्या पूर्वजांनी ऋतू चक्र, अर्थ चक्र आणि सामाजिक जीवन व्यवस्थेची अशी काही सांगड घातली आहे की, कोणत्याही परिस्थितीत समाजात कधीच निराशा पसरणार नाही. गेल्या काही दिवसांत आपण अनेक सण साजरे केले. काल, संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. एखादे व्यक्तिमत्व असे असेल याची कोणी कल्पना करू शकेल का, आज हजारो वर्षांनंतरही, प्रत्येक उत्सव नाविन्य घेऊन येतो, नवीन प्रेरणा घेऊन येतो, नवीन ऊर्जा घेऊन येतो आणि हे हजारो वर्षांपूर्वीचे असे आयुष्य आहे ज्याचे उदाहरण आपण आजच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देऊ शकतो, त्यातून प्रेरणा घेऊ शकतो, श्रीकृष्णाच्या जीवनापासून सध्याच्या समस्यांची उत्तरे शोधू शकतो. इतका सामर्थ्यवान असून देखील तो कधी रासलीलेमध्ये रमायचा, तर कधी गायींमध्ये तर कधी गवळ्यांमध्ये, कधी खेळात मग्न, तर कधी बासरी वाजवत, न जाणो अशा विविधतांनी समृद्ध असे हे व्यक्तिमत्व, अद्वितीय सामर्थ्याचे धनी, परंतु, आपले आयुष्य समाजाला अर्पण केलेले, लोकांसाठी अर्पण केलेले, लोक-संग्राहक म्हणून नवीन विक्रम स्थापन करणारे व्यक्तिमत्व. मैत्री कशी असावी, तर सुदामाची घटना कोणी कशी विसरू शकेल? इतके गुण असून देखील तो युद्धभूमीवर सारथी झाला. कधी पर्वत उचलायचा, तर कधी जेवणाच्या पत्रावळी उचलायच्या, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत एक नाविन्य आहे आणि म्हणूनच आज मी जेव्हा तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा, माझे लक्ष दोन मोहनकडे जाते. एक सुदर्शन चक्रधारी मोहन, तर दुसरा चरखाधारी मोहन. सुदर्शन चक्रधारी मोहन यमुनानगरी सोडून, गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन द्वारकेत जाऊन राहिले तर समुद्र किनारी जन्माला आलेले मोहन, शेवटच्या श्वासापर्यंत यमुनेच्या किनारी दिल्लीमध्ये राहिले. सुदर्शन चक्रधारी मोहनने त्याकाळच्या परिस्थितीत, हजारो वर्षांपूर्वी देखील, युद्ध टाळण्यासाठी, संघर्ष टाळण्यासाठी, आपल्या बुद्धीचा, आपल्या कर्तव्याचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या चिंतनाचा योग्य वापर केला आणि चरखाधारी मोहनने देखील स्वातंत्र्यासाठी, मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी, एक असा मार्ग निवडला जो व्यक्तिमत्वाच्या मुलभूत घटकांना बळकट करेल- यासाठी स्वातंत्र्य लढ्याला एक असे रूप दिले, जे संपूर्ण जगासाठी त्यावेळी देखील एक आश्चर्य होते आणि आजही ते एक आश्चर्य आहे. निस्वार्थ सेवेचे महत्त्व असो, ज्ञानाचे महत्त्व असो किंवा आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात हसत पुढे जाण्याचे महत्व असो, भगवान श्रीकृष्णाच्या संदेशातून आपण ते शिकू शकतो आणि म्हणूनच श्रीकृष्ण जगतगुरू म्हणून ओळखले जातात. “कृष्णम वंदे जगद्गुरुम”.
आज आपण जेव्हा उत्सवांविषयी चर्चा करत आहोत, तेव्हाच भारत अजून एका मोठ्या उत्सवाची तयारी करण्यात मग्न आहे आणि केवळ भारतच नाहीतर संपूर्ण जगात याची चर्चा सुरु आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी बोलतो आहे महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती विषयी. 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदरच्या समुद्र किनाऱ्यावर, ज्याला आज आपण कीर्ती मंदिर म्हणतो, त्या छोट्याश्या घरात एका व्यक्तीचा नाहीतर एका युगाचा जन्म झाला होता. ज्याने मानवी इतिहासाला एक नवीन दिशा दिली, नवीन विक्रम स्थापित केले. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाशी एक गोष्ट कायमच जोडलेली आहे, खरं तर ती त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती आणि तो आहे – सेवा-भाव, सेवेबद्दलचे कर्तव्य. त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर जर नजर टाकली तर, आपल्याला जाणवेल, की, दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी वर्णभेदाचा सामना करणाऱ्या लोकांची सेवा केली, त्याकाळात ही खूप मोठी गोष्ट होती. चंपारण्यात ज्या शेतकऱ्यांशी भेदभाव होत होता ते त्यांच्या बाजूने उभे राहिले, योग्य मजुरी न मिळणाऱ्या कामगारांच्या बाजूने त्यांनी लढा दिला, त्यांनी गरीब, निराधार, दुर्बल आणि उपाशी लोकांची सेवा केली आणि हेच आपल्या जीवनाचे अंतिम कर्तव्य समजले. कुष्ठरोगाविषयी समाजात अनेक भ्रम होते ते सर्व दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः कुष्ठरुग्णांची सेवा केली. आपल्या आयुष्यात सेवेची अनेक उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. त्यांनी सेवा केवळ शब्दांमधून नाही, तर स्वतःच्या आचरणातून शिकवली होती. सत्यासोबत गांधीजींचे जितके अतूट नाते होते तितकेच अतूट नाते सेवाभावनेशी होते. जेव्हा कधी कोणाला गरज असायची महात्मा गांधी त्यांची सेवा करायला नेहमी उपस्थित असायचे. त्यांनी केवळ सेवेवरच नाहीतर त्याच्याशी निगडीत आत्मसुखावर देखील भर दिला. संपूर्ण आनंदाने सेवा केली जावी यातच त्याची सार्थकता आहे- सेवा परमो धर्म. परंतु यासोबतच परमानंद, ‘स्वान्त: सुखाय:’ या भावनेचा आनंद मिळणे हे देखील अंतर्भूत आहे. बापूंच्या आयुष्यापासून हे आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. महात्मा गांधी हे असंख्य भारतीयांचा आवाज तर बनलेच परंतु, एकप्रकारे ते मानवी मूल्य आणि मानवी प्रतिष्ठेसाठी संपूर्ण जगाचा आवाज झाले होते. महात्मा गांधीसाठी व्यक्ती आणि समाज, मानव आणि मानवता हेच सर्वकाही होते. आफ्रिकेमधील फिनिक्स फार्म असो किंवा टॉल्स्टॉय फार्म असो, साबरमती आश्रम असो किंवा वर्धा, सर्व ठिकाणी आपल्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी नेहमीच सामाजिक संवर्धन आणि एकत्रीकरणावर भर दिला आहे. परमपूज्य महात्मा गांधीजींशी निगडीत अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांना प्रणाम करण्याची मला संधी मिळाली आहे हे माझे सौभाग्य आहे. मी असे सांगू शकतो की, गांधीजी सेवाभावने सोबतच संघटन भावनेवर देखील भर द्यायचे. समाज सेवा आणि समाज संवर्धन, समुदाय सेवा आणि समुदाय एकत्रीकरण या भावना आपल्याला आपल्या व्यावहारिक आयुष्यात देखील आणल्या पाहिजेत. महात्मा गांधींना हीच खरी श्रद्धांजली आहे, खऱ्या अर्थाने कार्यांजली आहे. अशा खूप संधी येतात, आपण सहभागी देखील होतो, परंतु गांधीजींची 150वी जयंती अशीच येऊन निघून जाईल, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही देशवासियांनो. आपण सर्वांनी स्वतःलाच विचारूया, चिंतन करूया, मंथन करूया, सामुहिक चर्चा करूया. आपण समाजातील इतर लोकांसोबत, सर्व वर्गांसोबत, सर्व वयोगटातील लोकांसह- गाव असुदे, शहर असुदे, पुरुष असो, स्त्री असो, सर्वांसोबत एक व्यक्ती म्हणून या प्रयत्नांमध्ये अजून काय करू शकतो? माझ्याकडून अजून काय मूल्यवर्धन असेल? आणि सामुहिकतेचे स्वतःचे एक सामर्थ्य असते. गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमात सामुहिकता देखील असावी आणि सेवाभाव देखील असावा. आपण सगळे एकत्र बाहेर येऊया. जर आपला फुटबॉलचा संघ आहे, तर मग फुटबॉलचा संघ, फुटबॉल तर खेळणारच पण त्यासोबतच गांधीजींच्या एखाद्या आदर्शाला अनुसरून काही सेवाकर्म देखील करूया. जर तुमचा लेडीज क्लब आहे. लेडीज क्लबची आधुनिक युगातील जी कामे आहेत, ती तर करूयाच परंतु, लेडीज क्लब मधील सगळ्या सख्यांनी एकत्र येवून कोणतेतरी सेवाकार्य करूया. खुप काही करू शकतो. जुनी पुस्तकं एकत्र करून ती गरिबांना देऊन ज्ञानाचा प्रसार करूया आणि मला हे माहित आहे की, 130 कोटी देशवासियांकडे 130 कोटी कल्पना आहेत, 130 कोटी उपक्रम राबवू शकतो. याला कोणतंच बंधन नाही- जे काही मनात येईल ते- फक्त चांगली इच्छा असावी, शुद्ध हेतू असावा, चांगली भावना असावी आणि संपूर्ण समर्पण भावनेने सेवा करावी आणि ती देखील स्वांत: सुखाय – एक परमानंदासाठी.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही महिन्यांपूर्वी मी, गुजरातमध्ये दांडी येथे गेलो होतो. दांडी इथले ‘मीठ सत्याग्रह’ स्वातंत्र्य संग्रामात एक महत्वाचे वळण आहे. महात्मा गांधींना समर्पित एका अत्याधुनिक संग्रहालयाचे मी, दांडीमध्ये उद्घाटन केले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही देखील आगामी काळात गांधीजींशी निगडीत कोणत्यातरी एका जागेला नक्की भेट द्या. ही जागा कोणतीही असू शकते – पोरबंदर असो, साबरमती आश्रम असो, चंपारण असो, वर्ध्याचा आश्रम असो आणि दिल्ली मधील महात्मा गांधींशी निगडीत जागा, तुम्ही जेव्हा या स्थळांना भेट द्याल तेव्हा तुमचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करा म्हणजे इतर लोकांना देखील त्यातून प्रेरणा मिळेल त्यासोबतच तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या दोन-चार ओळी देखील लिहा. तुमच्या मनातील या भावना कोणत्याही मोठ्या साहित्यिक रचनेहून जास्त प्रभावी असतील आणि कदाचित तुमच्या नजरेतून, तुमच्या लेखणीतून समोर आलेले गांधीजींचे हे रूप आजच्या काळात अधिक प्रासंगिक वाटेल. येणाऱ्या काळात अनेक कार्यक्रम, स्पर्धा, प्रदर्शनांचे आयोजन करण्याची योजना देखील तयार आहे. परंतु यासंदर्भात एक सुरस गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो, व्हेनिस बिएनाले नावाचा एक प्रसिद्ध आर्ट शो आहे. जिथे जगभरातील कालाकार सहभागी होतात. यावेळी व्हेनिस बिएनालेच्या भारतीय पॅव्हेलियनमध्ये गांधीजींच्या आठवणींशी निगडीत अतिशय वेधक प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये हरिपुरा पॅनेल्स विशेष चित्तवेधक होते. तुम्हाला लक्षात असेलच की, गुजरातच्या हरीपुरामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, ज्यात सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष म्हणून निवडल्याच्या घटनेची इतिहासात नोंद आहे. या आर्ट पॅनेल्सचा खूप सुंदर भूतकाळ आहे. काँगेसच्या हरिपुरा अधिवेशनापूर्वी 1937-38 मध्ये महात्मा गांधींनी शांती निकेतन कलाभवनाचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांना आमंत्रित केले होते. कलेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील लोकांची जीवनशैली प्रदर्शित करावी आणि त्यांच्या या कलाकृतींचे प्रदर्शन अधिवेशन व्हावे अशी गांधीजींची इच्छा होती. हे तेच नंदलाल बोस आहेत ज्यांची कलाकृती आपल्या राज्यघटनेची शोभा वाढवत आहे. राज्यघटनेला एक नवीन ओळख देते. नंदलाल बोस यांनी हरिपूरच्या आसपासच्या काही गावांना भेटी दिल्या आणि सरतेशेवटी ग्रामीण भारताच्या जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या काही कलाकृती कॅनवासवर उतरवल्या. या अनमोल कलाकृतीची व्हेनिसमध्ये खूप चर्चा झाली. पुन्हा एकदा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत प्रत्येक भारतीय काहीतरी नवीन संकल्प करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. देशासाठी, समाजासाठी, दुसऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे. हीच बापूंना चांगली, खरी, प्रामाणिक कार्यांजली असेल.
भारतमातेच्या मुलांनो, तुम्हाला लक्षात असेलच की, मागील काही वर्षांपासून आपण 2 ऑक्टोबरच्या आधी अंदाजे 2 आठवडे संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबवतो. यावर्षी हे अभियान 11 सप्टेंबरपासून सुरु होईल. याकाळात आपण सर्वांनी आपल्या घरातून बाहेर पडून श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करूया. घर असुदे किंवा गल्ली, चौक असोत किंवा नाले, शाळा, महाविद्यालयांपासून सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महाअभियान राबवायचे आहे. यात प्लास्टिकवर विशेष लक्ष द्यायचे आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी सांगितले होते की, ज्या उत्साह आणि ऊर्जेने सव्वाशे कोटी देशवासीयांनी स्वच्छतेचे अभियान सुरु केले, हागणदारीमुक्त भारतासाठी काम केले, त्याचप्रकारे आपल्याला एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर एकत्रितपणे संपवायचा आहे. समाजातील सर्व वर्गामध्ये या अभियानासाठी उत्साह दिसत आहे. माझ्या अनेक व्यापारी बंधू-भगिनींनी आपल्या दुकानात एक फलक लावला आहे ज्यावर लिहिले आहे की, ग्राहकांनी आपली पिशवी सोबत घेऊन यावी. यामुळे पैसे देखील वाचतील आणि पर्यावरण संरक्षणात ते आपले योगदान देखील देवू शकतील. यावर्षी 2 ऑक्टोबरला जेव्हा आपण बापूजींची 150वी जयंती साजरी करू तेव्हा आपण त्यांना केवळ हागणदारीमुक्त भारत समर्पित नाही करणार तर त्याच दिवशी आपण प्लास्टिक विरुद्ध जनआंदोलनाची मुहूर्तमेढ देखील रोवूया. मी समाजातील सर्व वर्गांना, प्रत्येक गाव, खेड्यातील आणि शहरातील रहिवाशांना विनंती करतो, हात जोडून प्रार्थना करतो की, यावर्षी आपण गांधी जयंती आपल्या भारत मातेला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी साजरी करूया. 2 ऑक्टोबर विशेष दिवस म्हणून साजरा करूया. महात्मा गांधी जयंतीचा दिवस एक विशेष श्रमदानाचा उत्सव बनवूया. देशातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, शासकीय-अशासकीय व्यवस्था, सर्व संस्था, प्रत्येक नागरिक, मी सर्वांना विनंती करतो की प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी. मी कॉर्पोरेट क्षेत्राला देखील आवाहन करतो की जेव्हा हा सर्व प्लास्टिक कचरा संकलित केला जाईल तेव्हा त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुढे यावे, विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असली पाहिजे. यावर पुनर्प्रक्रिया होऊ शकते. यातून इंधन बनवता येईल. याप्रकारे या दिवाळीपर्यंत या प्लास्टिक कचर्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे काम आपण पूर्ण करू शकतो. केवळ संकल्प केला पाहिजे. आपल्याला प्रेरणेसाठी दुसरीकडे पाहण्याची गरज नाही गांधीजींपेक्षा मोठी प्रेरणा दुसरी असूच शकत नाही.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपली संस्कृत भाषा म्हणजे ज्ञानाचे एक रत्न आहे. आयुष्यात आपल्याला जे पाहिजे ते यातून मिळू शकते. आजकाल माझा संस्कृतशी संबंध खूप कमी झाला आहे पण पूर्वी माझा संबंध खूप होता. आज मला एका संस्कृत सुभाषितातून खूप महत्वाच्या गोष्टीला स्पर्श करायचा आहे आणि या शतकांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी आहेत, परंतु आजही त्याचे किती महत्त्व आहे. एक उत्तम सुभाषित आहे; या सुभाषितात सांगितले आहे-
“पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा प्रदीयते” ||
याचा अर्थ असा की, पृथ्वीमध्ये जल, अन्न आणि सुभाषित – ही तीन रत्न आहेत. मूर्ख लोकं दगडाला रत्न समजतात. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला खूप महत्व आहे. एवढेच नाहीतर आपण अन्नाविषयीच्या ज्ञानाला देखील विज्ञानात परावर्तीत केले आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. विशेषत: महिला आणि नवजात शिशुंसाठी, कारण ते आपल्या समाजाच्या भविष्याचा पाया आहेत. पोषण अभियानांतर्गत आधुनिक वैज्ञानिक पद्धतींद्वारे सकस आहाराला संपूर्ण देशभरात एक जनआंदोलनाचे रूप दिले जात आहे. लोकं नवीन आणि अभिनव मार्गाने कुपोषणाविरुद्ध लढा देत आहेत. कधीतरी मला कोणी एक गोष्ट सांगितली होती. नाशिकमध्ये ‘मूठभर धान्य’ हे एक मोठे आंदोलन सुरु आहे. यामध्ये कापणीच्या दिवसात अंगणवाडी सेविका लोकांकडून मूठभर धान्य गोळा करतात. या धान्याचा उपयोग मुले आणि महिलांसाठी ताजा आहार देण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे, देणगी देणारी व्यक्ती एकप्रकारे जागरूक नागरिक, समाजसेवक बनतो. यानंतर, तो स्वत: ला या कार्यासाठी समर्पित करतो. तो या चळवळीचा एक सैनिक बनतो. आपण सर्वांनीच भारताच्या कानाकोपऱ्यातील कुटुंबांमध्ये उष्टावण विधी याबद्दल ऐकलं आहे. जेव्हा मुलाला पहिल्यांदा ठोस आहार दिला जातो तेव्हा हा विधी केला जातो. पातळ पदार्थ नाही ठोस आहार. यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, गुजरात सरकारने 2010 मध्ये ‘अन्न प्राशन संस्कारा’ वेळी मुलांना निशुल्क अन्न देण्याचा विचार केला. हा एक उत्तम उपक्रम आहे जो प्रत्येकजण स्वीकारू शकतो. अनेक राज्यांमध्ये लोक तिथी भोजन अभियान राबवतात. कुटुंबात जर कोणाचा वाढदिवस असेल, कोणता शुभदिवस असेल, कोणाचा स्मृतिदिन असेल तर कुटुंबातील लोक सकस आणि रुचकर अन्न शिजवून ते घेऊन आंगणवाडीत जातात, शाळांमध्ये जातात आणि कुटुंबातील लोक स्वतः मुलांना वाढतात आणि खाऊ घालतात. आपला आनंद वाटतात आणि तो द्विगुणीत करतात. सेवाभावना आणि आनंद भावना यांचा हा अद्भुत संगम दिसून येतो. मित्रांनो, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपला देश कुपोषणाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढू शकेल. आज जनजागृतीच्या अभावामुळे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही कुटुंबांना कुपोषणाचा फटका बसला आहे. संपूर्ण देशात सप्टेंबर महिना हा ‘पोषण अभियान’ म्हणून राबवला जाईल. तुम्ही सगळे यात सहभागी व्हा, माहिती मिळवा, काहीतरी नवीन समाविष्ट करा. तुम्ही देखील योगदान द्या. तुम्ही एका व्यक्तीला जरी कुपोषणमुक्त केले तर, याचा अर्थ असा होतो की तुम्ही देशाला कुपोषणमुक्त करत आहात.
“नमस्कार सर, माझे नाव सृष्टी विद्या आहे आणि मी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. सर, मी 12 ऑगस्टचा बेयर ग्रिल्स सोबतचा तुमचा भाग पाहिला. सर, हा भाग पाहून मला खूप आनंद झाला. सर्वात आधीतर, तुम्हाला आपल्या निसर्गाची, वन्य जीवनाची आणि वातावरणाची इतकी काळजी आहे हे ऐकून आनंद झाला आणि सर, तुम्हाला या नवीन साहसी रुपात बघून मला खूप आनंद झाला. या एपिसोड दरम्यान तुमचा अनुभव कसा होता हेदेखील जाणून घ्यायची माझी इच्छा आहे आणि सर शेवटी अजून एक गोष्ट, तुमची तंदुरुस्ती पाहून आमच्यासारखी तरुण मंडळी खूप प्रभावित आणि खूप प्रेरित झाली आहेत.”
सृष्टीजी तुमच्या फोन कॉलसाठी धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच हरियाणामधील सोहनाहून के के पांडेजी आणि सूरतच्या ऐश्वर्या शर्माजी यांच्यासह अनेकांना ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या भागाबद्दल जाणून घ्यायचे आहे. यावेळी जेव्हा मी ‘मन की बात’ बद्दल विचार करत होतो तेव्हा मला खात्री होती की, या विषयावर बरेच प्रश्न येतील आणि तसेच घडले. गेल्या काही आठवड्यांमध्ये मी जिथे जिथे गेलो आणि लोकांना भेटलो तिथे ‘मॅन वर्सेस वाइल्ड’चा विषय निघालाच. या एका भागामुळे मी केवळ भारतातीलच नाहीतर जगभरातील तरुणांशी जोडला आहे. तरुणांच्या हृदयात अशाप्रकारे माझे स्थान निर्माण होईल, असा मी कधी विचारच केला नव्हता. मी कधी विचार केला नव्हता की, आपल्या देशातील आणि संपूर्ण जगातील युवक इतक्या विविध गोष्टींकडे लक्ष देतात. माझ्या आयुष्यात मला कधी जगभरातील युवकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्याची संधी मिळेल, याचा मी कधीच विचार केला नव्हता. आणि काय होते? मागील आठवड्यात मी भूतानला गेलेलो. मी पाहिले आहे की जेव्हा जेव्हा पंतप्रधान म्हणून मला परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अशी परिस्थिती बऱ्याचदा होते की मी जगात कुठेही गेलो, कोणाशी चर्चा करत असेन तेव्हा कोणीतरी पाच ते सात मिनिटे तरी मला योगाबद्दल प्रश्न विचारतो. क्वचितच जगातील एखादे मोठे नेते असतील ज्यांनी माझ्यासोबत योग चर्चा केली नसेल आणि मला हा अनुभव संपूर्ण जगभरातून आला आहे. जो कोणी भेटतो, जिथे कुठे चर्चा करण्याची संधी मिळते, ते वन्यजीवांविषयी चर्चा करतात, पर्यावरणाविषयी चर्चा करतात. वाघ, सिंह, जीवसृष्टी आणि मी आश्चर्यचकित होतो की, लोकांना किती आवड आहे. डिस्कव्हरीने 165 देशांमध्ये त्यांच्या भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करण्याची योजना आखली आहे. आज जेव्हा वातावरण, ग्लोबल वार्मिंग, हवामान बदलाविषयी जागतिक मंथन सुरू आहे. मला आशा आहे की अशा परिस्थितीत डिस्कव्हरी वाहिनीच्या या भागामुळे जगाला भारताचा संदेश, भारताची परंपरा, भारताच्या संस्कारांमध्ये निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता याची ओळख होईल, असा माझा ठाम विश्वास आहे आणि आता लोकांना क्लायमेट जस्टीस आणि स्वच्छ वातावरणाच्या दिशेने भारताने उचललेल्या पावलांविषयी जाणून घ्यायचे आहे. परंतु, आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी की, काही लोक संकोचून मला एक गोष्ट विचारतात की, मोदीजी तुम्ही हिंदीमध्ये बोलत होतात आणि बेयर ग्रिल्सला हिंदी येत नाही, मग तुम्हा दोघांमध्ये इतका छान संवाद कसा होत होता? हे नंतर संपादित केले आहे का? हे शूटिंग वारंवार केले आहे का? काय झाले? मोठ्या उत्सुकतेने विचारतात. हे पहा यात काहीच रहस्य नाही. बर्याच लोकांच्या मनात हे प्रश्न आहेत, म्हणून मी हे रहस्य उलगडतोच. वास्तविकता अशी आहे की बीयर ग्रिल्स सोबत संवाद साधताना तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. जेव्हा मी काहीही बोलायचो तेव्हा लगेचच त्याचा इंग्रजी अनुवाद व्हायचा. बेयर ग्रील्सच्या कानात एक छोटेसे कॉर्डलेस उपकरण लावले होते. मी बोलायचो हिंदीत आणि त्याला ते ऐकू यायचे इंग्रजीत ! त्यामुळे संवाद सुलभ झाला होता आणि तंत्रज्ञानाची हीच तर कमाल आहे. या कार्यक्रमानंतर, मला मोठ्या संख्येने लोक जिम कॉर्बेट, नॅशनल पार्कबद्दल चर्चा करताना दिसले. तुम्ही देखील निसर्ग आणि वन्यजीव आणि वन्य प्राण्यांशी संबंधित जागी नक्की जा. मी यापूर्वीही सांगितले आहे, मी तुम्हाला नक्कीच सांगतो. तुम्ही आयुष्यात एकदातरी ईशान्येला नक्की जा. काय सुंदर निसर्ग आहे तिथे. तुम्ही बघतच राहाल. तुमचे आंतरिक अस्तित्व वाढेल. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी तुम्हाला विनंती केली होती की, पुढील तीन वर्षांमध्ये तुम्ही किमान 15 स्थळांना आणि भारतातील 15 जागा आणि 100 टक्के पर्यटनासाठी अशा 15 ठिकाणी जा, त्या बघा, त्यांचा अभ्यास करा, कुटुंबासोबत जा काही वेळ तिथे घालवा. वैविध्यांनी परिपूर्ण असा देश तुम्हाला देखील या विविधता एक शिक्षक म्हणून, तुमचा आंतरिक विस्तार होईल. तुमची विचारसरणी व्यापक होईल. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथून तुम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, नवीन प्रेरणा घेऊन याल आणि कदाचित तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील काही ठिकाणी पुन्हा-पुन्हा जावेसे वाटेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतात पर्यावरणाची काळजी घेण्याची वृत्ती स्वाभाविकपणे दिसून येते. गेल्या महिन्यात मला देशात वाघांची गणना जारी करण्याचा बहुमान मिळाला. तुम्हाला माहित आहे का, की भारतात किती वाघ आहेत? भारतातील वाघांची संख्या 2967 आहे. दोन हजार नऊशे सदुसष्ट. काही वर्षांपूर्वी याच्या अर्ध्या संख्येने देखील वाघ नव्हते. 2010 मध्ये रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे व्याघ्र परिषद झाली होती. यात वाघांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत एक संकल्प केला होता. वर्ष 2020 पर्यंत संपूर्ण जगात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा तो संकल्प होता. परंतु हा नव-भारत आहे इथे आम्ही लवकरात लवकर उद्दिष्टे पूर्ण करतो. आम्ही 2019 पर्यंतच वाघांची संख्या दुप्पट केली. भारतातील वाघांची संख्याच नव्हे तर संरक्षित क्षेत्रे आणि राखीव समुदाय वनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जेव्हा मी वाघांची आकडेवारी जाहीर करत होतो, तेव्हा मला गुजरातच्या गीरमधील सिंहांची आठवण झाली. जेव्हा मी तिथे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हा गीरच्या जंगलात सिंहांचे अधिवास कमी होत होते. त्यांची संख्या कमी होत होती. गीरमध्ये आम्ही एकामागून एक पावले उचलली. 2007 मध्ये तेथे महिला रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली. जेव्हा आपण निसर्ग आणि वन्यजीवनाबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ संवर्धनाबद्दल बोलत असतो. पण, आता आपण संवर्धनाच्या पलीकडे जाऊन संवेदनेविषयी विचार केला पाहिजे. आपल्या शास्त्रांमध्ये या विषयी खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. शतकांपूर्वी आपण आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे:
निर्वनो बध्यते व्याघ्रो, निर्व्याघ्रं छिद्यते वनम |
तस्माद् व्याघ्रो वनं रक्षेत्, वनं व्याघ्रं न पालयेत् ||
म्हणजेच जर जंगले नसतील तर वाघांना नाईलाजाने मानवी वस्तीत यावे लागते आणि मग त्यांची हत्या केली जाते आणि जर जंगलात वाघ नसले तर माणूस जंगल तोडून त्याचा नाश करतो, म्हणूनच प्रत्यक्षात वाघ जंगलाचे रक्षण करतो, जंगल वाघांचे नाही – आपल्या पूर्वजांनी किती उत्तम प्रकारे हा विषय समजावून सांगितला आहे. म्हणूनच, आपण केवळ आपली जंगले, वनस्पती आणि वन्यजीवांचे केवळ संरक्षण करण्याची गरज नाहीतर एक असे वातावरण तयार करणे देखील आवश्यक आहे जिथे ते योग्यप्रकारे बहरू शकतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 11 सप्टेंबर 1893, स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक भाषण, कोण विसरू शकेल. संपूर्ण जगाच्या मानवजातीला भारावून टाकणारा भारताचा हा तरुण संन्यासी जगात भारताची एक तेजस्वी ओळख निर्माण करून आला होता. ज्या गुलाम भारताकडे संपूर्ण जग अत्यंत हीन भावनेने पाहत होते. त्याच जगाला 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांच्या शब्दांनी भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडले. चला, स्वामी विवेकानंदांनी भारताचे जे रूप पहिले होते, स्वामी विवेकानंदांनी भारताचे जे सामर्थ्य ओळखले होते. आपण सर्वांनी ते जगण्याचा प्रयत्न करूया. आपल्यात सर्व काही आहे. आत्मविश्वासाने मार्गक्रमण करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वाना लक्षात असेलच की 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आम्ही देशभरात ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ सुरू करणार आहोत. आपण स्वत:ला निरोगी ठेवायचे आहे, देशालाही निरोगी ठेवायचे आहे. मुले, वृद्ध, तरुण आणि महिला प्रत्येकासाठी ही एक अतिशय अभिनव मोहीम असेल आणि ती आपली स्वतःची असेल. परंतु आज मी त्याविषयीचा तपशील सांगणार नाही. 29 ऑगस्टची वाट पहा. मी स्वतः त्यादिवशी या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहे. आणि मी तुम्हाला यात सहभागी करून घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मला तुला निरोगी बघायचे आहे. मी तुम्हाला आरोग्याविषयी जागरूक करू इच्छितो आणि निरोगी भारतासाठी आपण एकत्र येऊन काही लक्ष्य देखील निश्चित करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी 29 ऑगस्ट रोजी सुदृढ भारतात तुमची वाट पाहीन. सप्टेंबरमध्ये ‘पोषण अभियानात’ आणि विशेषत: 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात ‘स्वच्छता अभियानामध्ये’ आणि 2 ऑक्टोबर पूर्णपणे समर्पित असेल प्लास्टिक मुक्तीसाठी. प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठी आपण सर्वजण घरात, घराबाहेर सगळीकडे जोमाने काम करू आणि मला माहित आहे की या सर्व मोहिमा सोशल मीडियामध्ये एक ठसा उमटवतील. चला, एक नवीन आवेश, नवीन संकल्प, नवीन सामर्थ्याने पुढे जाऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया. मी तुमच्या गोष्टी, तुमच्या सूचनांची वाट पाहत आहे. चला, स्वातंत्र्यप्रेमींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी, गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी, आपण सर्वजण एकत्र येऊ या – ‘स्वांत: सुखाय’ म्हणजेच आपला आनंद निर्माण करण्यासाठी सेवा भावनेने चालत राहूया.
खूप खूप धन्यवाद
नमस्कार!