टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

568

पुणे प्रतिनिधी

जलसंपदा मंत्री गिरीश महाइजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली होती व त्यानंतर टेमघर धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी सर्व गळती बंद करण्यासाठी आवश्यक ती कामे हाती घेण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.

त्याअनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत गेल्या दोन वर्षापासून गळती प्रतिबंधक कामे हाती घेण्यात आली होती. या कामांची पाहणी करण्यासाठी श्री महाजन यांनी आज प्रकल्पस्थळी दौरा केला. टेमघर धरणाची गळती सन 2016 च्या तुलनेत सुमारे 90 टक्के कमी झाली असून आता धरण सुरक्षित झाले असल्याची खात्री त्यांनी यावेळी केली.

राज्यातील सर्वाधिक गळके धरण अशी ओळख असलेले टेमघर धरण गळतीमुक्त करण्यासाठी ग्राऊंटींग व शॉर्टक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामे पूर्णत्वास येत आहेत. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नास आता यश आले असून राज्यातील इतर धरणांमधील गळती देखील “टेमघर पॅटर्न” नुसार बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टेमघर धरण यावेळी शंभर टक्के भरले होते व खडकवासला धरणातून पुणे शहराच्या पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. डिसेंबर 2019 पर्यंत धरण रिकामे करून उर्वरित गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई जलसंपदा विभागाने करावी, असे निर्देश त्यांनी दिले.