गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या संरक्षणासाठी पुणे पोलिस दलाने कंबर कसली

594

भूषण गरुड, पुणे
गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या संरक्षणासाठी पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. चोरटे आणि गुन्हेगारांवर साध्या वेशातील पथकांची करडी नजर राहणार आहे.  त्यादृष्टीने गुन्हे शाखेने सोमवारपासून उत्सवातील बंदोबस्ताला सुरवात केली आहे.

उत्सवात चोरटे, गुन्हेगारांचा वावर वाढतो. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने ठोस उपाययोजना केल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील,  विविध राज्यांतील नागरिकांसह परदेशी भाविक पुण्यात येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखेने विशेष लक्ष दिले आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. या गर्दीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे २० वरिष्ठ अधिकारी व १२० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. ते साध्या वेशामध्ये गस्त घालणार आहेत. पाकीट, सोनसाखळी, मौल्यवान वस्तू, रोकड चोरणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून कारवाई केली जाईल. याबरोबरच महिला, तरुणींना छेडणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठीही काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दक्षतेसाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’
देशातील महत्त्वाच्या घडामोडींमुळे दक्षतेचा उपाय म्हणून गुन्हे शाखेकडून सोमवारपासूनच वाहनांच्या तपासणीवर विशेष भर दिला आहे. विशेषतः जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीवर करडी नजर असून, विक्रेते व ग्राहकांची कसून तपासणी करण्यास गुन्हे शाखेने प्राधान्य दिले.

गणेशोत्सवात गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे. उत्सवात गुन्हे घडून भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी १४० हून अधिक अधिकारी-कर्मचारी साध्या वेशात कार्यरत आहेत.
– अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा