‘मीरा द म्युजिकल’मधून उलगडणार संतकथा – सांगीतिक नाट्य कार्यक्रमाचे आयोजन

759

सागर बोदगिरे, पुणे,

 द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने मीरा द म्युजिकल या सांगीतिक नाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. १५) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेसहा ते साडे आठ दरम्यान होणार असून यामध्ये क्रांतिकारी संतांची कला, संस्कृती आणि कथेचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नृत्य सदरकर्त्या श्रीविद्या वर्चस्वी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धीरज अगरवाल, विशाखा अगरवाल, सुनील पोतदार, अमोल येवले उपस्थित होते.

वर्चस्वी म्हणाल्या, मीरा द म्युजीकल हा कार्यक्रम
यापूर्वी 150 हून अधिक देशांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला असून पुण्यामध्ये सांगीतिक नाट्याचा हा पहिलाच प्रयोग होणार आहे. यामध्ये रसिकांना संगीताच्या तालावर विविध नृत्य कलांचा आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. यात भरतनाट्यम, लोकगीते आणि कथकसारख्या शास्त्रीय नृत्यांचा समावेश असणार आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना धीरज अगरवाल म्हणाले “या कार्यक्रमात नृत्य सादरीकरण श्रीविद्या वर्चस्वी करणार असून त्या वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्य क्षेत्रात आहे. यापूर्वी त्यांनी नाट्यांजली फेस्टीव्हल, द पुणे फेस्टिवल, वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल बर्लिन येथे कला सादरीकरण केले आहे. अद्वितीया आणि शक्तिशिवा ही त्यांची वैशिष्टपूर्ण कलाकृती असून त्या वर्ल्ड कल्चरल फेस्टीव्हल २०१९ च्या संचालिका आहेत.”
“आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक आणि मानवहितकारी चळवळ आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी संस्थेतर्फे दत्तक घेतलेल्या सातशेहून अधिक गावांमधील किशोरवयीन आणि गरजू मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. शिवाय, २२ राज्यातील सत्तर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तूही पुरवण्यात येणार आहे. सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था ही स्त्री सबलीकरण आणि सर्वशिक्षा अभियान ही उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.” असेही अगरवाल यावेळी बोलताना म्हणाले.