भाजपाची मागील पाच वर्षातील कामगीरी अतिशय दमदार व समाधानकारक

740

उरुळी कांचन, महेश फलटणकर

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची मागिल पाच वर्षातील कामगीरी अतिशय दमदार व जनेतेचे समाधान करणारी ठरली आहे.

शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचीही मागिल पाच वर्षातील कामगिरी दमदार झाली असल्याने, मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बाबुराव पाचर्णे म्हणजेच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरुळी कांचन व कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. 14) केले.

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरुळी कांचन येथे एलाईट चौकात तर कदमवाकवस्ती येथे भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयासमोर रथावरुन मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी उपस्थित झालेल्या नागरीकांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी नागरीकाना वरील आवाहन केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जगताप, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे अजिंक्य कांचन, उरुळी कांचनचे शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, कमलेश काळभोर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जनतेला पटली असल्याने विरोधाकांनी किमान पुढील पंचविस वर्षे तरी विरोधात राहण्याचा सराव करावा. मोंदीमुळे भारताकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. मोंदीच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र तयार होत आहे. ३७० कलम रद्द केल्याने काश्मीरमध्ये नवा आशावाद तयार झाला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, केंद्र सरकारप्रमानेच राज्य सरकारची मागिल पाच वर्षामधील कामगिरीही सर्वच क्षेत्रात उजवी राहिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशातील मतदार नरेंद्र मोटी यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याचप्रमाने राज्यातील मतदारांनी राज्याच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद पहाता मतदार महायुतीला पुन्हा निवडुन देतील यात कोणताही संशय नाही. राज्य सरकारच्या कामगिरीप्रमानेच आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही शिरुर व हवेलीसाठी मोठा निधी मिळवुन, दोन्ही तालुक्याचा दमदार विकास साधला आहे. राज्याच्या व आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीला संधी द्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.