रिक्षावाला’ फेम गायिका रेश्मा सोनावणेचा आवाज अपूर्वा कवडेच्या ‘फंडूगिरी’ अल्बममध्ये!

602

पुणे प्रतिनिधी,

मराठी संगीतश्रोते नेहमीच उत्तम संगीताला दाद देत आले आहेत. नाट्यसंगीत, भावगीतं वा चित्रपटसंगीत, सर्वच संगीत प्रकारांना त्यांनी पाठिंबा दिलाय. हल्ली-हल्ली प्रसिद्ध झालेला ‘सिंगल्स’ हा प्रकारही त्यांनी उचलून धरला. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या ‘सिंगल’ मधून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली गायिका रेश्मा सोनावणे हिने ‘पप्पी दे पारूला’, ‘गुलाबी नोट दोन हजारांची’, ‘साजूक तुपातली’ सारख्या गाण्यांनी अधिकच यश मिळविले. संगीतकार वेगळ्या दमदार आवाजातील उडत्या गाण्यांसाठी तिला निमंत्रित करू लागले. तिची जवळपास सर्वच गाणी सुपर हिट झाली आहेत. आता तिने ‘फंडूगिरी’ या नवीन गाण्याला आपला आवाज दिला असून सर्वांनाच विश्वास आहे की ते देखील प्रचंड यश मिळवेल.

‘फंडूगिरी’ या गाण्याचे बोल ‘मन माझे झाले कसे उधाण..’ आहेत जे लिहिले आहेत आकाश पवार यांनी व त्यावर स्वरसाज चढवलाय प्रणय प्रधान आणि राजू पांचाल या संगीतकारद्वयीने. नुकताच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘एक होतं पाणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन सातघरे या ‘म्युझिन विडिओ’ चे दिग्दर्शन करीत असून डीओपी योगेश अंधारे यांच्या कॅमेऱ्याने गाण्याला चारचाँद लावलेत. स्वप्नील जाधव संकलकाची भूमिका पार पाडत असून मार्केटिंगची जबाबदारी रियाझ बलोच यांनी सांभाळली आहे.

‘फंडूगिरी’ मध्ये अपूर्वा कवडे ही अभिनेत्री असून तिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ न घातली तर नवल. अपूर्वा कवडे ने अभिनय केलेला ‘चिंध्या’ नावाचा लघुपट २०१७ साली सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नॉमिनेट झाला होता. तसेच तिने नुकताच एक हिंदी चित्रपट केलाय. ‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करीत असून तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहिद मल्ल्या आहेत. वर्ष उसगावकर व अनुपसिंग ठाकूर सारख्या दिग्गज कलाकारांसोबतसुद्धा तिने काम केले आहे. अपूर्वा एक चांगली अभिनेत्री तर आहेच परंतु ती उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे व ‘बॉलिवूड डान्सिंग स्टाईल’ साठी प्रसिद्ध असलेले गणेश आचार्य यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. नुकताच तिने ‘सोनिया रांझणा’ हा हिंदी म्युझिक अल्बम केला, ज्यात तिचा अभिनय, नृत्य यांचा संगम बघायला मिळतो.

अपूर्वा कवडे या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, सुप्रसिद्ध गायिका रेश्मा सोनावणे यांचा अनोखा आवाज लाभलेला व दिग्दर्शक रोहन सातघरे यांचा परिसस्पर्श लाभलेला म्युझिक विडिओ ‘फंडूगिरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.