राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महेश शिंदे यांची नियुक्ती

995
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी महेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र दिले. गेल्या ३०-३५ वर्षांपासून महेश शिंदे आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते असून, राज्यभरात दलित, बहुजन, कष्टकरी आणि कामगार वर्गाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांच्या न्याय मागण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून लढा देण्याचे काम महेश शिंदे यांनी केलेले आहे. पक्ष बळकट आणि मजबूत करण्यासाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात महेश शिंदे यांची भूमिका मोलाची राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महेश शिंदे यांच्या निवडीबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रिपब्लिकन श्रमिक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गौतम माने, पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, पुणे शहराध्यक्ष निलेश थोरात, माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, संदीप सपकाळ यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत महेश शिंदे म्हणाले, प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दलित, बहुजनांना न्याय देणारे सरकार स्थापन करायचे असून, त्यासाठी राज्यभरातील जनतेची ताकद त्यांच्यामागे उभी करणार आहे. गेल्या पाच वर्षात दलित, बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार वाढत आहे. त्यांच्या न्यायासाठी आगामी काळात रस्त्यावर उतरून काम करणार आहे.