अहमदनगरच्या मातीतील ‘ट्रिपल सीट’ दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

1455

पुणे प्रतिनिधी

कला, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्र आता पुणे, मुंबई शहरापर्यंत मर्यादित न राहता विस्तारत आहे. हा विस्तार होताना छोट्या शहरातील, गावातील कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या शहरात जाऊन कार्यरत झाले असे अनेकदा दिसते. मात्र आपल्या शहरात या मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी या भावनेतून प्रतिष्ठेच्या ‘अहमदनगर महाकरंडक’ स्पर्धेची सुरुवात अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटच्या नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांच्या मदतीने झाली, आज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता नरेंद्र फिरोदिया आणि महाकरंडक आयोजनातील त्यांचे सर्व सहकारी ‘ट्रिपल सीट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येउन अहमदनगरच्या मातीतील चित्रपट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर घेउन येत आहेत.

हौशी रंगभूमीची पाळेमुळे महाराष्ट्राच्या अनेक शहरात रुजलेली दिसतात मात्र पुढे याचे रुपांतर व्यावसायिक स्वरूपात होताना फारसे दिसत नाही. अहमदनगर शहरात विविध नाट्यसंस्था कार्यरत आहेत, त्यात स्वप्निल मुनोत आणि पुष्कर तांबोळी यांची ‘हाऊसफुल्ल’ आणि अभिजित दळवी यांची ‘रंगसाधना’ यांचा समावेश आहे. या दोन्ही संस्था महाराष्ट्रभर फिरत दरवर्षी ५० ते ६० एकांकिका सादर करत होत्या. एकाच शहरातील या दोन संस्थांमध्ये अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एकांकिका स्पर्धेसाठी गेल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने  स्वप्निल मुनोत, पुष्कर तांबोळी आणि अभिजित दळवी यांना आपण उत्तम नियोजन असलेली एकांकिका स्पर्धा घ्यावी असे वाटायचे. त्यांच्या याच विचारांना नरेंद्र फिरोदिया यांनी आर्थिक पाठबळ देताना कोणतेही प्रश्न उपस्थित न करता महाराष्ट्रातील सर्वात उत्तम एकांकिका स्पर्धा जी कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतीला समृद्ध करेल अशा स्पर्धेचे नियोजन करण्याचे ठरवले. तसेच त्यांनी सुचना केली की, रंगभूमीवर मेहनत करणाऱ्या आपल्या कलाकारांना भविष्यात संधी देऊ शकतील, सहकार्य करू शकतील असे कलाकार परीक्षक असायला पाहिजेत. यातून २०१३ साली ‘अहमदनगर महाकरंडक’ स्पर्धेचा श्रीगणेशा झाला आणि या स्पर्धेला आजपर्यंत केदार शिंदे, विजय पाटकर, प्रविण विठ्ठल तरडे, सुनील बर्वे, सुजय डहाके, किरण यज्ञोपावित, राजन ताम्हाणे, अमित भंडारी, अश्विन पाटील अशी दिग्गज मंडळी परीक्षक म्हणून लाभली आहे. पुढे यातूनच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगबाई अरेच्चा २’ या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र फिरोदिया यांनी केली.

दरम्यान, महाकरंडक आयोजक कलाकारांचा विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रवास सुरू झाला. पुढे स्वप्निल मुनोत यांच्या वाचनात हैद्राबाद मधील एक घटना आली, यावरून अभिजित दळवी यांनी कथा लिहिली आणि ‘ट्रिपल सीट’ चा प्रवास सुरु झाला. हळू हळू कलाकार, तंत्रज्ञ चित्रपटाशी जोडले जात होते. मुख्य भूमिकेसाठी अंकुश चौधरी यांचा विचार सुरु असताना निर्माते वगळता इतर सर्वांचा पहिला चित्रपट असल्याने ते होकार देतील का? अशी शंका सर्वांच्याच मनात होती. मात्र कथा ऐकल्यावर आणि लेखक, दिग्दर्शक व इतर सर्वांची रंगभूमीशी जोडली गेलेली नाळ, कलेविषयीची आस्था बघून त्यांनी होकार दिला. चित्रपटाच्या तन्वी या पात्रासाठी अनेक अभिनेत्रींचा विचार झाला, मात्र कुठेतरी योग जुळत नव्हते. दरम्यान, संजय मेमाणे यांनी शिवानी सुर्वेचे नाव सुचवले, २ – ३ ऑडीशन्स मधून तिची निवड करण्यात आली. ही भूमिका आव्हानात्मक असल्याने शिवानी देखील तिच्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका करण्यासाठी उत्सुक होती. संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट पूर्णपणे अहमदनगर शहरात चित्रित झाला आहे. आपल्या ५०० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असलेल्या शहराची ओळख संपूर्ण मराठी प्रेक्षकांना व्हावी असा हेतू निर्माते नरेंद्र फिरोदिया यांचा यामागे होता.