जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

751

पुणे,   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर वीज, दिव्यांगासाठी व्हील चेअर, रॅम्प, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात येणार असून त्यासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी 15 ऑक्टोबरपर्यंत करण्यात यावी, असे  निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी राम यांनी सर्वप्रथम हडपसर येथील श्रीमती लक्ष्मीबाई मगर प्राथमिक विद्यालयात उभारणी सुरू असलेल्या तात्पुरत्या मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मनपा शाळा क्रमांक 100 बंटर शाळा गाडीतळ हडपसर, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, संपर्काचे साधन, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. सर्व मतदान केंद्रावर वीज, रॅम्प, दिव्यांगासाठी व्हील चेअर, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही  त्यांनी निर्देश दिले.