गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते भिडणार ‘फ्रेन्डशिप टी २० कप’ साठी

496

पुणे प्रतिनिधी,

 यंदाचा गणेशोत्सव व नवरात्र उत्सव यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘माणिकचंद ऑक्सीरिच महोत्सव’ हा सांगीतिक मेजवानी असलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘उत्सव आनंदाचा, सोहळा एकतेचा’ असे ब्रीद असलेल्या या महोत्सवाचे औचित्य साधत युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळ कार्यकर्ते, आणि कलाकारांच्या संघाचा समावेश असलेल्या ‘फ्रेन्डशिप टी २० कप’ क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. 

या प्रसंगी ‘माणिकचंद ऑक्सीरिच महोत्सव’च्या आयोजक शोभा र. धारीवाल, जान्हवी र. धारीवाल, पुनीत बालन यांच्यासह राजकुमार अग्रवाल, महेश सूर्यवंशी, विवेक खटावकर, अण्णा थोरात, अॅड. प्रताप परदेशी, राजाभाऊ टिकार, राजेंद्र गुप्ता तसेच हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळासह शहरातील प्रमुख गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

या स्पर्धेबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले, या स्पर्धेत गणेशोत्सव  मंडळाचे ८ संघ, नवरात्रोत्सव मंडळाचे २ संघ, ढोलताशा पथकाचे २ संघ, प्रसार माध्यमांचा १ संघ, ऑक्सीरिच ग्रुपचा १ संघ, पुनीत बालन ग्रुपचा १ संघ आणि कलाकारांचा १ संघ असे  एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने कटारिया हायस्कूलच्या मैदानात १३, १४ व १५ मार्च २०२० रोजी रंगणार आहेत.

महोत्सवाच्या आयोजनाबद्दल बोलताना शोभा र. धारिवाल म्हणाल्या, गणेशोत्सव आणि माणिकचंद ग्रुपचे संबध फार जुने आहेत. रसिकशेठ धारिवाल यांनीही असाच महोत्सव आयोजित केला होता, आता त्यांचा उपक्रम पुनीत बालन यांनी पुनरुज्जीवीत केला आहे. गणेशोत्सवात छोट्या कामगारांपासून कार्यकर्ते, पदाधिकारी राबत असतात मात्र त्यांची मेहनत सामान्य लोकांना दिसत नाही, त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक वाटते. तसेच मंडळाच्या माध्यमातून उत्सव साजरा होतो, मात्र त्यापलीकडे जाऊन मंडळांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवावेत असा या महोत्सवाच्या आयोजना मागील हेतू आहे. आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही रक्त संकलन, वृक्षारोपण, नेत्रदान, विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबविले जातात यामध्येही मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच हा महोत्सव दरवर्षी दसऱ्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणार असल्याचेही शोभा धारिवाल यांनी सांगितले.

ऑक्सीरिचच्या अध्यक्षा जान्हवी र. धारिवाल म्हणाल्या, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळाचा एक – एक कार्यकर्ता म्हणजे मौल्यवान मोती असतो, आपण एकत्र आल्याने अमुल्य अशी मोत्यांची माळ निर्माण होणार आहे, त्याची किंमत कुणीही करू शकणार नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे असे आवाहन केले व सर्व मंडळांना आणि कार्यकर्त्यांना ऊंच वाढणारी देशी झाडांची रोपे भेट दिली

महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नृत्य, गायनाचा आनंद लुटला व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विनोद सातव यांनी केले.