आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना रब्बी पेरणीसाठी मोफत बियाणे वाटप

560

ज्ञानेश्वर टकले, पिंपरी, 

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या स्मरणार्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि भारत मातेच्या रक्षणासाठी बलीदान देणाऱ्या शहिद जवानांच्या कुटुंबियांना, तसेच गरजू शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ज्वारी व हरभरा बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.
ट्रस्टतर्फे तुळजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे व शहिद जवानांच्या कुटुंबियांना ‘जय जवान, जय किसान बियाने दान’ उपक्रमाचा शुभारंभ ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, नगरसेवक सचिन रोचकरी, पंचायत समिति सदस्य दत्ता शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, नितीन चिलवंत, राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, किरण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्यवंशी, शिवाजी सुतार, अजीज सिद्धीकी, राजेश गाटे, विशाल डांगे, प्रभाकर उळेकर, व्यंकट हैतगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, की मराठवाडा ही थोर संतांची पुण्यभूमि आहे. अरुण पवार हे कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले असले, तरी आपल्या मातृभूमीला विसरले नाहीत. त्यांनी कष्ट करून मोठे यश मिळवले. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी, पर्यावरणपूरक कामे सुरू आहेत. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबे व शहिद सैनिक यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी मोफत बियाने वाटप, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदत, गरीब रूग्णांना औषधींची मदत, तसेच वृक्षारोपण, रक्तदान, नोकरी विषयक रोजगार मेळाव्यांचे आयोजन करीत असतात.
नितीन चिलवंत म्हणाले, पुण्यातील मोठमोठे उद्योगपती व कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा मराठवाड्यातील नागरीक, विद्यार्थी यांच्यासाठी कसा उपयोग करता येईल, याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरूण पवार होते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले.