‘रिपाइं’ महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार

601

भाजपच्या शिष्टाईला यश; संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची माहिती

पुणे : पुण्यातील आठ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेंट विधानसभेची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (A) मिळावी असा आग्रह असतानाही त्या जागेवर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा करून ‘आरपीआय’ला जागा दिली नाही. त्यामुळे दुखावलेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी ‘रिपाइं’ नेत्यांबरोबर बैठक घेऊन मनधरणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ‘रिपाइं’ निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होणार असून, महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणणार आहे.
भाजप व रिपाइं यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ व रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे उज्ज्वल केसकर, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, संघटक मोहन जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंतराव बनसोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष वसीम शेख आदी उपस्थित होते.
अशोक शिरोळे म्हणाले, “पक्षाला एकही जागा न सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याचा परिणाम म्हणून पुणे शहरामध्ये भाजपच्या एकाही उमेदवाराचे काम करायचे नाही, असे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले होते. त्याप्रमाणे गेले दहा दिवस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने आठही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या एकाही उमेदवाराचे काम केले नाही. याची दखल खासदार गिरीश बापट व माधुरी मिसाळ घेत ‘रिपाइं’च्या नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांवर विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकत्र बैठक घेऊन त्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गिरीश बापट व माधुरी मिसाळ यांनी दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात रिपब्लिकन पक्षासह प्रत्येक मतदारसंघात समिती स्थापन करून रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊन एकत्र काम करण्याचे ठरले आहे. पक्षाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघांमध्ये पन्नास हजार याप्रमाणे आठ मतदारसंघात चार लाख पत्रके वाटून मतदारांशी संपर्क साधला जाईल. उमेदवारांच्या प्रचार यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाग घेतला जाईल.”
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “महायुतीचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपाइं’ प्रचारापासून दूर राहणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून आश्वासक तोडगा काढला आहे. भाजपने नेहमीच मित्रपक्षांचा आदर केला असून, त्यांच्या मागण्यांचे समाधान करण्यासाठी माझ्यासह शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यातील स्मारकासाठी ५-६ एकर जागा द्यावी, नोकऱ्यातील मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १५ जागा मिळाव्यात, महापौर किंवा उपमहापौर रिपाइंला द्यावे, राज्य पातळीवरील महामंडळात पुण्यातील नेत्यांना अधिकाधिक संधी द्यावी, खडकी व पुणे कॅन्टोमेंटच्या निवडणुकीत प्रत्येकी एक जागा द्यावी, अशा मागण्या ‘रिपाइं’ने केलेल्या आहेत. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून या मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार आहे.” कलम ३५३ मधील सुधारणा आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय निवडणुकीतनंतर तातडीने घेऊ असे आश्वासनही माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिले.