‘पुणे तिथे काय उणे, मतदानाही पुढे पुणे’

590

पुणे प्रतिनिधी,

पुणे जिल्‍ह्यातील मतदानाची टककेवारी वाढावी, यासाठी अनेक माध्‍यमांचा वापर केला जात आहे. गेल्‍या लोकसभा निवडणुकीत पुणे शहरात मतदानाचे प्रमाण कमी होते, सर्वच क्षेत्रात पुणे आघाडीवर असतांना नेमके मतदानाबाबत पुणेकर मागे का हा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. विधानसभा निवडणुकीसाठी पुणेकरांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी त्‍यांच्‍या भावनेलाच हात घालण्‍यात आला आहे. त्‍यासाठी ‘पुणे तिथे काय उणे, मतदानाही पुढे पुणे’ या गीताचा चपखल वापर करण्‍यात आला आहे.

‘पुणे तिथे काय उणे

मतदानाही पुढे पुणे

विद्येच्या ह्या माहेरघरी,

पुणेकर व्होटिंग करी

पुणे पुढे, पुढे पुणे

पुढे पुणे, पुणे पुढे

संस्कृतीचं माहेरघर

व्होटिंग बाय पुणेकर

पुणे पुढे, पुणे पुढे पुढे

जगाच्या पाठीवर सगळीकडे पुणेकर आहे.

कारण त्याचं स्वतःचं एक मत आहे!

व्होटिंग को भी आगे पुणे,

ह्यावेळी पुणेकर मागे राहणार नाहीत!

चला, आख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून देऊया की पुणेकर मतदानालाही मागे नाहीत!

ताई माई अक्का, वाढवा व्होटिंगचा टक्का’

पुणे जिल्‍ह्यात ‘स्‍वीप’ (सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविला जात आहे. उपजिल्‍हाधिकारी अजय पवार, आशाराणी पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा समन्‍वयक यशवंत मानखेडकर, सहायक आयुक्‍त अण्‍णासाहेब बोदडे यांच्‍यासह इतर अनेक अधिकारी त्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

‘पुणे तिथे काय उणे, मतदानाही पुढे पुणे’ या गीताच्‍या निर्मितीची कहाणीही रंजक आहे. मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व समन्‍वय अधिका-यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये कन्सेप्ट कम्युनिकेशनचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर आणि माध्यम सल्लागार डॉ. गिरीश रांगणेकर ह्यांनी त्यांच्या काही कल्पना मांडल्या. त्यावेळी अगदी काही मिनिटांत सुचलेल्या काही कॅप्शन्स/ टॅग लाईन्सच्या ८-१० ओळी त्यांनी सर्वाना वाचून दाखवल्या आणि त्या सर्वांच्याच पसंतीस उतरल्या. बैठकीतून बाहेर पडता-पडता त्यांना त्या ओळींतून गाणं सुचलं आणि गाडीत बसल्यावर एका हाताने ठेका देत मोबाईलवर ते गाणं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून त्यांनी ते स्टुडिओला पाठवून दिलं. त्यानंतर लगेचच स्टुडिओत जाऊन त्यांनी ते गाणं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमोर पेश केलं त्यावेळी जिल्हाधिकारी आणि इतर उपस्थित अधिकाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या गाण्‍याचा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि इतरांच्‍या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला. हे गाणं सध्‍या सोशल मिडीयावर मतदारांच्‍या पसंतीस पडत आहे. या गाण्‍यामुळं मतदानाच्‍या टक्‍केवारीत वाढ होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त होत आहे.
राजेंद्र सरग, ज‍िल्‍हा माहिती अधिकारी, पुणे