रेकॉर्डवरील फरारी आरोपीकडून पिस्तूले जप्त

699

गणेश जाधव,पुणे

पोलीस अभिलेखावर असलेले फरार आरोपी तसेच सराईत तडीपार गुन्हेगार यांचा शोध घेण्यासाठी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार संतोष शिरसागर यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून संगम चौक ,शास्त्री नगर, कोथरूड येथे सापळा रचला असता पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार समाधान सिकंदर राऊत यास पोलिसांनी अटक केले .त्यावेळी पोलीस झडतीदरम्यान त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे अशी एकूण एक लाख 61 हजार रुपयांची हत्यारे जप्त करण्यात आली .गुन्हेगार समाधान राऊत यांनी ती हत्यारे अनमोल जाधवराव रा.शांतीबन चौक ,सुरज नगर ,कोथरूड ,पुणे व त्याचा मित्र मंदार कदम रा. कराड ,सातारा यांच्याकडून विकत घेतल्याचे कळले तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार होते.

पोलिस त्यांच्या मागावर असताना त्यातील एक आरोपी अनमोल उर्फ चिंटू अतुल जाधवराव यास हॉटेल पीकॉक ,सुभाष नगर शुक्रवार पेठ येथे अटक करण्यात आली . झडती दरम्यान त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे अशी एकूण 40 हजार आठशे रुपयाची हत्यारे हस्तगत करण्यात आली. आरोपीकडून एकूण तीन पिस्टल व सहा जिवंत काडतुसे असा एकूण मुद्देमाल दोन लाख दोन हजार रुपयाची हत्यारे हस्तगत करण्यात आलेली आहेत .

सदर आरोपी अनमोल जाधवराव याच्याविरुद्ध चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन ,पुणे येथे खुनाचा प्रयत्न तर कोथरूड, पुणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
या आरोपींनी शस्त्रास्त्रे कोठून आणली ?का आणली ?आणखी इतर कोणास अशी शस्त्रास्त्रे विकलेली आहेत का ?गुन्ह्यात शस्त्रास्त्रांचा वापर तर केला नाही ना ?याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत .आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले .सदर कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त श्री .अशोक मोराळे पोलीस, उपायुक्त गुन्हे पुणे शहर श्री. बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे ,डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीनचे श्री राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी केलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे करत आहेत.