प्रतिभा ही कुठल्या राजवाड्यात जन्म घेत नाही : विश्वास पाटील

785

राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनाचे उत्साहात उदघाटन

पिंपरी, प्रतिनिधी :
प्रतिभा ही कुठल्या राजवाड्यात जन्म घेत नाही किंवा लेखनासाठी घरची आर्थिक परिस्थितीही आड येत नाही. मुला मुलींचा त्या त्या वयात सन्मान झाला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांमधून उत्तम लेखक, कवी घडतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
        शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिल्या शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वास पाटील बालचमुंना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण पवार, संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे, शब्दधन जीवन गौरव काव्यमंचाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, सहायक शिक्षण संचालक अशोक पानसरे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, मसाप पिं-चिं. चे अध्यक्ष राजन लाखे, बाल साहित्यिक सानिका भालेराव, निरुपमा भेंडे, पांडुरंग साने, रामदास वाघमारे, विजय भदाणे, विजय दोडे, प्रकाश खुंदे,  राहुल इंगळे, प्रा. प्रशांत शेळके,सोमनाथ वाघ, उमेश कुंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे आणि शब्दधन जीवन गौरव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 
           विश्वास पाटील यांनी सांगितले, की विद्यार्थी जीवनात उत्तमोत्तम लेखकांच्या पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. उत्तम वाचन केल्याशिवाय लेखनाला बळ मिळणार नाही. वाचलेलं स्मरणात ठेवणंही तितकंच गरजेचे आहे. निरसं दूध पचवल्याशिवाय पैलवान घडत नाही. त्याप्रमाणे उत्तम वाचल्याशिवाय तुम्ही लेखक, कवी बनू शकणार नाही. गड किल्ल्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आपली मराठी भाषा ही जगातली सर्वोत्तम भाषा आहे. एखाद्या गोष्टीचे वर्णन मराठीसारखे इतर कोणत्याच भाषेत होऊ शकत नाही. तुकोबा ज्ञानोबाची भाषा खेड्यापाड्यात जपली जात आहे, असेही ते म्हणाले.
        पाटील पुढे म्हणाले, की महाराष्ट्र हे संमेलन उत्सुक आहे. आपल्या आजूबाजूला स्फूर्तीचे झरे मोठ्या प्रमाणात वाहत असतात. याची आपण नोंद ठेवत नाही. सतत फिरले, आजूबाजूला नजर ठेवली, तर आपोआप आपल्या लेखनातील पात्रे जमत जातात. काळाच्या आड गेलेले स्फूर्तीचे झरे पानिपत कादंबरीत मिळतात. धाडस करून लिहिले पाहिजे. माझे निरीक्षण असे आहे की मधल्या काळात झालेल्या लेखकांपैकी सत्तर टक्क्यांहून अधिक लेखक हे शिक्षकी पेशातील होते. शिक्षक हे समाज, पिढी घडविण्याचे काम करीत असतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अवतीभवतीच्या घटनांची नोंद घ्यायला शिकवून लेखनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांमुळेच पानिपत कादंबरी साकारली असल्याचेही त्यांनी सांगितले.
          शिवानंद स्वामी महाराज यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले, की मुलांना चांगले ज्ञान मिळावे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबर गुणांनीही मोठे झाले पाहिजे. कला आणि गुणानेच माणूस मोठा होतो. ज्ञानमार्गातूनच अढळपद प्राप्त होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
          स्वागताध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, की उद्याची पिढी घडविण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलन विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे. आपला स्वाभिमान हरवून बसू नका. जगा व जगू द्या हा मंत्र अवलंबावा. आई, वडील, शिक्षकांना विसरू नका. भरपूर वाचा, भरपूर लिहा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
        प्रा. संपत गर्जे म्हणाले, प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगवेगळा असतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.
         सानिका भालेराव ही उभारती लेखिका म्हणाली, एक दोन कविता, कथा लिहिल्या म्हणजे आपण खूप मोठे लेखक, कवी झालो, असे समजून हुरळून जाऊ नका. लेखन, वाचन चळवळ हा उद्देश वाढीस लागण्याच्या दृष्टीने बालकुमार साहित्य संमेलन उपयोगी पडेल. 
           अशोक पानसरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हवा. आज सोशल मीडियावर कॉपी पेस्ट करणारे भरपूर आहेत. चांगले विचार विद्यार्थ्यांमध्ये उतरविण्यास हे साहित्य संमेलन निश्चित उपयोगी ठरेल. मनात येणारे विचार मनात व्यक्त झाले पाहिजेत. आज वाचन संस्कृती कमी होतेय, वाचनाची इच्छाशक्ती संपत चाललीय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 
           संमेलनासाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक, साहित्यिक यांच्या उपस्थितीत होते. तसेच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर शिंदे, राहुल इंगळे, प्रशांत शेळके, सोमनाथ वाघ, उमेश कुंदे यांनी केले.