जिल्हा नियोजन विभागाची कामे लवकरच एका क्लीकवर – जिल्हा नियोजन अधिकारी केंभावी

641

पुणे:-  जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता एक दिवसीय आय-पास प्रणालीचा प्रशिक्षण कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी  मार्गदर्शन करतांना जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी बोलत होते. या प्रशिक्षणास निखील साबळे, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, शाखा अभियंता राजेश खरात, हनुमंत देवकाते, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, प्रमोद उंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी गौरव बोरकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) सुनिल कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.         

            नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफीस ऑटोमेशन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.   आय- पास नावाची संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वयीत केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश या प्रणालीत असणार आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यान्वयीन यंत्रणा इंटरनेटव्दारे जोडल्या जाणार आहेत. जनतेसाठी प्रत्येक जिल्हयाचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.

त्यामुळे जिल्हयातील कामकाज संगणकीकृत होवून सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.संबंधित विभागाच्या अधिकारी यांना आपल्या प्रस्तावाबाबत काय परिस्थिती आहे, निधी आला किंवा नाही, प्रस्ताव पास झाला किंवा नाही हे एका क्लीकवर दिसणार आहे असेही ते म्हणाले.यावेळी  विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.