व्यसन लागलेल्या लोकांमुळे आज व्यसनमुक्ती कार्य हे चळवळ म्हणून राबविण्याची गरज निर्माण झाली आहे – महेश झगडे

835

पुणे – भारता बरोबरच जागतिक पातळीवरही व्यसनाचे प्रमाण तीव्र आहे. शासनातर्फे आतापर्यंत दारूबंदी शिवाय अन्य कोणतीही मोहीम व्यसनमुक्ती साठी राबवण्यात आलेली नाही तेव्हा आता स्वयंसेवी संस्थांनी​च  व्यसनमुक्ती साठी लढा दिला पाहिजे असे मत माजी पालिका आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले.

पुण्यात मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि रोटरी घाटकोपर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय व्यसनमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी महेश झगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

झगडे म्हणाले, राज्यात गुटखा उत्पादन बंद करुन देखील  शेजारील राज्यातून गुटखा आयात होतो. बंदी असताना देखील व्यसनकारक पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री केली जाते हे शासन आणि पोलीस यंत्रणा कमकुवत असल्याचे लक्षण आहे. मुळात व्यसन-कारक पदार्थांच्या उत्पादनातून पैसा कमावण्याचे व्यसन लागलेल्या लोकांमुळे आज व्यसनमुक्ती साठी चे कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

परिषदेची सुरुवात आयोजक डॉक्टर प्रकाश महाजन यांच्या ‘व्यसन एक रोग’ या व्याख्यानाने झाली. त्यांनी मद्यपान व्यसनाची मूलभूत कारणे या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदे मधे विविध वयोगटातील​ स्त्रिया, पुरुष आणि मुले यांना जडणारी विविध प्रकारची व्यसने, व्यसनमुक्ती साठी केले जाणारे औषधोपचार, समुपदेशन, मोबाईल चे व्यसन, कौटुंबिक समुपदेशन, औषधोपचार, दारू तसेच अमली पदार्थांचे व्यसन सोडवण्यासाठी चे व्यवस्थापन, बालपणात आणि पौगंडावस्थेत जडणारे तंबाखूचे व्यसन आणि औषधोपचार या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेत दारू आणि अंमली पदार्थाच्या व्यसनातून मुक्त झालेल्या अज्ञात व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या परिषदेमध्ये वैद्यकीय समुपदेशक, वैद्यकीय प्रतिनिधी, डॉक्टर्स, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे स्वयंसेवक, समाजसेवक, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, मानसोपचारतज्ञ सहभागी झाले होते. त्यांना डॉ. रूपा अगरवाल, द्विजेन स्मार्त, डॉ. स्वप्नील देशमुख, डॉ. आशुतोष चौहान, डॉ. रोहन बारटक्के आणि डॉ.आलोक देवधर यांनी मार्गदर्शन केले. सी. जी. देशपांडे यांनी ‘मानवी वर्तन बदलण्यासाठीचे कौशल्य’ या वर कार्यशाळा घेतली. या वेळी मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन चे विश्वस्त कॅप्टन अशोक गोळे आणि रोटरी घाटकोपर (मुम्बई ) चे योगेश झवेरी उपस्थित होते.

परिषदेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी परिषदेत झालेल्या  विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली आणि त्यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. डॉ.अर्चना चौघुले, डॉ. ज्योती शिंदे आणि डॉ. कुशल महाजन यांनी परिषदेचे संयोजन केले.