आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य; न्यायाधीश नीरज धोटे

637

पुणे प्रतिनिधी,

आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नीरज धोटे यांनी केले.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ(फेस्कॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-२००७ विषयावरील कार्यशाळा न्यायाधीश नीरज धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री. धोटे म्हणाले, आई-वडिलांच्या त्यागाचे स्मरण मुलांनी नेहमी ध्यानात ठेवायला हवे. आई-वडील व ज्येष्ठांच्या भावनांचा आदर राखून त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी. ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी च्या अधिनियमाची जनजागृती होणे गरजेचे आहे. हा कायदा प्रभावीपणे राबवून ज्येष्ठांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत कमी वेळेत न्याय मिळावा, यासाठी या कायद्याचे अधिकार हे महसूल विभागाकडे देण्यात आले आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाज करत असताना ज्येष्ठ नागरिकांना जलदगतीने न्याय मिळवून देवून आपली क्षमता सिद्ध करुन दाखवावी.

न्यायाधीश एच आर वाघमारे म्हणाले, ज्येष्ठांना आदराची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून सध्या त्याचा विसर पडत आहे. या परिस्थितीत ज्येष्ठांच्या कायद्यांची जनजागृती ही गरजेची बाब बनली आहे.

पुण्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, आपला पाया भक्कम करुन आपली उभारणी करण्याचे श्रेय आई-वडिलांचे असते. आपण जितक्या उच्च पदावर काम करत आहोत, तितका जास्त त्रास आई-वडिलांनी आपल्यासाठी सहन केला आहे, याची जाणीव सदैव ठेवायला हवी. एकत्र कुटुंब पध्दती आणि आई-वडिलांना सन्मानाची वागणूक देणे, ही आपली संस्कृती असून सध्या या संस्कृतीचा विसर पडत आहे, ही खेदाची बाब आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव चेतन भागवत यांनी आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, या कायद्याचा आधार घेऊन ज्येष्ठांना जलदगतीने न्याय मिळवून द्यावा. तसेच ज्येष्ठांचे प्रश्न प्रशासन व ज्येष्ठ नागरिक यांनी समन्वयाने सोडवायला हवेत.

पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष सतीश मुळीक म्हणाले, आई आणि वडील हे कुटुंबातील महत्वाचे घटक आहेत. आई- वडिलांच्या भावनांचा आदर राखून त्यांची काळजीपूर्वक देखभाल करायला हवी. सध्या बऱ्याच कुटुंबातील आई-वडिलांना स्वतःच्या मुला- मुलींकडून व कुटुंबातील सदस्यांकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, हे खूपच खेदजनक आहे. ज्येष्ठांना आपुलकी दाखवून भावनिक आधार देणे गरजेचे आहे. पोलीसांनी ज्येष्ठांबरोबर मित्रत्वाची भूमिका बजावायला हवी.

समाजकल्याण विभागाचे पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती दिली.फेस्कॉम चे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी यांनी धर्मादाय आयुक्त विभागाशी संबंधित ज्येष्ठांचे प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले.

यावेळी केकर जवळेकर यांनी विमा योजनेची माहिती दिली.
पोलीस विभाग, समाजकल्याण विभाग, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी आभार मानले.
000000