आई वडील हेच खरे परमेश्वर : योग गुरु दीपक महाराज

1224

कोंढवा प्रतिनिधी:
ज्याप्रमाणे शरिराला असणारं श्वासाचं महत्व कधी सांगता येणार नाही, जमिनीचं आकाशाशी असणारं, दिव्याच वातीशी असणारं नातं शब्दात कसं सांगता येईल, तसंच अगदी आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातली सूक्ष्म आणि प्रत्येक गोष्ट शिकविली आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे त्यांचं महत्व हे शब्दांत मांडता नाही येणार नाही असे आपले आई वडील हेच आपले खरे परमेश्वर आहेत , घरातील देवाची पूजा करू नका पण रोज आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला प्रत्यक्षात परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो असा उपदेश ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे श्री गुरुदेव दीपक महाराज यांनी कोंढवा येथील संकटहरण महादेव मंदिरात मा.नगरसेवक तानाजी लोणकर यांनी आयोजित केलेल्या योगशिबिरात आलेल्या साधकांना -नागरिकांना केला.


या शिबिरामध्ये विविध योग प्रक्रियांना शास्त्रोक्त, पूर्णपणे आणि सुलभतेने शिकवले जाते. या शिबिराद्वारे निरोगी शरीर, शांत मन, ध्यान लागणे आणि आत्मविश्वास बळावण्यासाठी सर्वांगीण समतोल प्राप्त होतो.योगचा नियमित सराव करणाऱ्यांच्या जीवनशैली मध्ये उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. त्यांचे जुने आजार नाहीसे झाले, त्यांच्या वागणुकीत बदल झाले. तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते. यावेळी महारांजानी म्युझिक थेरपी, ध्यान ,झुंबा, साधनेद्वारे साधकांकडून योग करून घेतला . याप्रसंगी योग झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्या चिंता घटल्या, भीती , आनंदामध्ये वृद्धी, सहिष्णुता वृद्धी आणि सजगतेमध्ये वृद्धी झाल्याचे अनुभव सांगितले आहेत.