बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य -माहिती उपसंचालक मोहन राठोड

816

पुणे

बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे मत माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.

                मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व मॉडर्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मॉडर्न महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अमृता ओक, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. युगंधर शिंदे, मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  एमए मराठी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महेश कांबळे याचा तसेच ‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ मधील प्रथम पारितोषिक विजेता स्वप्नील पवार व अन्य विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून कीर्तनाचे निरुपण, कविता, आईसाठीचे पत्र वाचन असे विविध कलागुण सादर केले.

                श्री.राठोड म्हणाले, मराठी ही अडीच हजार वर्षांपुर्वीची भाषा आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषेत नाही. दैनंदिन व्यवहारात आवश्यक ठिकाणी इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करायला हवा, मात्र इंग्रजीचे ज्ञान घेताना मराठी भाषेकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.

                डॉ.अमृता ओक म्हणाल्या, व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव भाषेवर तर भाषेचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि संस्कृतीवर पडत असतो. आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या मातृभाषेतून संवाद व लेखनकलेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.डॉ. युगंधर शिंदे म्हणाले, प्रमाणभाषा ही व्यवहारासाठी उपयुक्त असून माणसांना माणसांशी जोडण्याचं काम बोलीभाषा करते, म्हणून बोलीभाषेचा देखील वापर करायला हवा. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रात बोलली जात नाही, तर बाहेरील राज्यात देखील बोलली जाते. मराठी माध्यमाच्या शाळा अन्य राज्यात देखील सुरु आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

                राजेंद्र सरग म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जान्हवी पुरंदरे व ऋतुजा चिंचपुरे या विद्यार्थिनींनी केले तर प्रा. विनोद पवार यांनी आभार मानले.