कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये बंद

674

पुणे प्रतिनिधी,

कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्‍याच्‍या सूचना मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्‍या असून त्‍याची अंमलबजावणी करण्‍याचे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. तथापि, 10 वी व 12 वीच्या परीक्षा सुरू राहतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. शासनाने खबरदारी म्‍हणून हे निर्णय घेतले आहेत. शाळांना सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांनी विनाकारण इकडे तिकडे भटकू नये, शक्यतो घरातच रहावे, पालकांनीही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. यासंदर्भात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहेत.
राज्यात आपत्कालीन कायदा लागू केला असून आज मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथील जिम, जलतरण तलाव, नाट्यगृहे, चित्रपट गृहे 30 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णयही मुख्‍यमंत्री श्री. ठाकरे यांनी जाहीर केला आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचा-यांना कंपन्‍यांनी शक्‍य असल्‍यास ‘वर्क फ्रॉम होम’ करु द्यावे, असेही त्‍यांनी आवाहन केले.