आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी नेमलेल्या मनपा शिक्षकांचे आरोग्य धोक्यात

2149

पुणे प्रतिनिधी,

आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी नेमलेल्या महानगरपालिका शिक्षकांचे हाल होत असल्याचे चित्र कोरोना विषाणू प्रादुर्भाव सर्वे निमित्ताने पाहायला मिळाले.शिक्षकांना कुठलेही प्रशिक्षण अथवा मास्क ,सॅनिटायझर,हँडवॉश ,हॅन्ड ग्लोज व इतर सामग्री न पुरवता घरोघरी जावून कोरोना विषाणूबाबतचा सर्वे करण्याकरिता मा. पुणे मनपा आयुक्त यांनी शिक्षकांना आदेश दिले आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापन कार्याला हजर राहून काम करण्याचे ठरविले त्याप्रमाणे अनेक शिक्षक क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्वेक्षणाचे काम सुरू केले असता शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. शासनाने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता व त्यासंबंधीची पूर्वकल्पना लोकांपर्यंत न पोहोचवता सर्वेक्षण कार्याला सुरुवात केल्यामुळे लोकवस्तीतून शिक्षकांना विरोध होत असल्याचे चित्र समोर आले .कोणतेही काम असो शिक्षकांच्या योगदानाशिवाय पूर्ण होत नाही. या राष्ट्रीय आपत्ती निवारण्याच्या कामात आमचे योगदान हे आम्ही आमचे भाग्य समजतो. परंतु प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळपास ७५०पेक्षा जास्त शिक्षकांना आदेश दिले आहेत.

एवढी लोक रस्त्यावर तसेच लोकवस्तीत फिरल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. लोकवस्तीमध्ये राहणारे रहिवासी शिक्षकांकडे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना ?अशा संशयाच्या नजरेने पाहत आहेत . कोरोना विषाणू सर्वे संदर्भात कोणतीही जनजागृती न करता शिक्षकांना सर्वे करता वेठीस धरले.

यापैकी अनेक स्त्री शिक्षिका स्तनदामाता ,गर्भवती माता , अंपग व मधुमेह, उच्च रक्तदाब ,हृदय रुग्ण आहेत तसेच जे शिक्षक बाहेरगावी गेल्यानंतर होम क्वारंटाईन झाले आहेत. लॉक डाऊनमुळे इच्छा असूनही आपत्ती व्यवस्थापन कामावर हजर होता येत नाही. त्यांचे आदेश रद्द होण्याबाबत संबधीत अधिकारी वर्गाला पुणे शहर प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.बाळकृष्ण चोरमले, शिक्षक नेते नितिन राजगुरु यांनी ई- मेलद्वारे पत्रव्यवहार केला .

नागपूर मनपा धर्तीवर कोरोना व्हायरस मदत तपासणी व सेवेसंदर्भात APP चा वापर करून सेर्वेक्षण करण्यात यावे ही शिक्षकांकडून मागणी केली जात आहे.आता सरकार दरबारी हीच विनंती आहे की कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना योग्य तो प्रकारे आरोग्याची व्यवस्था उपलब्ध करून त्यांना आरोग्य संबंधीच्या साहित्य उपलब्ध करून देणे व शिक्षकांचे आरोग्य सांभाळणे असे मत पुणे शहर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण चोरमले व उपाध्यक्ष नजन बंडोपंत यांनी व्यक्त केले.