कोरोनाग्रस्तांसाठी कोंढव्यात सुयोग लेहेर सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबीर

563

अनिल चौधरी, पुणे

संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे. पुणे शहरात तसेच राज्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठी कमतरता आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी योग्य सुरक्षेचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरे तसेच रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.   त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून तसेच मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोंढवा येथील सुयोग लेहेर या सोसायटीमधील रहिवासी मंदार पुरंदरे आणि दीपा पुरंदरे यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला,त्यानुसार त्यांनी याची कल्पना सोसायटीमधील इतर सभासदांना सांगितली, यानुसार सर्व सभासदांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करून ते यशस्वी केले.

  दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीशी संपर्क करून सुयोग लेहेर सोसायटी मधील 25 सभासदांनी कोरोना व्हायरस संदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन माक्स लावून तसेच सोशल डीस्टनचे नियम पाळून रक्तदान केले. यावेळी कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निबाळकर यांनी शिबिरास भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी दिनानाथ रक्तपेढीचे डॉक्टर दर्शन ठक्कर आणि रुपाली बांदल व इतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मंदार , सागर, अगरवाल, हजरत सय्यद तसेच इतर सभासदांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी दिनानाथ मंगेशकर रक्तपेढीचे डॉक्टर यांनी  कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन करून लोकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी केले. दरम्यान सुयोग लेहेर सोसायटी मधील नागरिकांनी पुढे होऊन रक्तदान शिबीर आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.