कोरोना- सरदार पटेल रुग्‍णालयाला सव्‍वा दोन कोटी- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

1275

पुणे प्रतिनिधी,

 जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने अनेक उपाय योजनांद्वारे त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्‍ह्यातील शासकीय रुग्‍णालयांप्रमाणेच खाजगी रुग्‍णालयांचीही या कामी मदत घेतली आहे. याचाच एक भाग म्‍हणून पुणे छावणी मंडळाच्‍या (पुणे कॅण्‍टोन्मेंट बोर्ड) सरदार वल्‍लभभाई पटेल रुग्‍णालयासाठी विशेष बाब म्‍हणून 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारणीसाठी उपलब्‍ध करुन दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी उपचारांची सुविधा उपलब्‍ध आहे. याच धर्तीवर छावणी परिसरातील नागरिकांना कोरोनाचा त्रास झाल्‍यास तातडीने उपचार त्‍या भागातच उपलब्‍ध व्‍हावेत, यासाठी सरदार पटेल रुग्णालयाला त्‍यांची यंत्रणा सज्ज ठेवण्‍यास सांगण्‍यात आले. लष्कर परिसरात एखाद्या व्‍यक्‍तीला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्‍या व्‍यक्‍तीला विलग करण्यासाठी 50 खाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. गरज भासल्यास या कक्षाची क्षमता शंभर ते 120 खाटांपर्यत वाढविण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याची गरज होती. त्यानुसार जिल्‍हाधिकारी राम यांनी मंडळाकडून प्रस्‍ताव मागवून घेतला आणि या प्रस्‍तावास प्राधान्‍याने मान्‍यता घेतली. राज्‍य सरकारकडून प्राप्‍त झालेला निधी मंडळाकडे वर्ग करण्‍यात आला आहे.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनीही सरदार पटेल रुग्णालयाच्‍या प्रस्‍तावासाठी पाठपुरावा केला. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर कुलजित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड यांनीही लष्‍कर परिसरात आरोग्‍य व स्‍वच्‍छतेबाबत तसेच कोरोनाविषयक जनजागृतीसाठी आवश्‍यक ते उपाय योजण्‍याचे निर्देश दिले आहेत.

 

जिल्‍ह्यात 161 निवारागृहे सुरु – जिल्‍हाधिकारी राम

विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 51 निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत 110 अशी 161 निवारागृहे सुरु करण्यात आली असून त्‍यामध्‍ये एकूण 37 हजार 629 कामगार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 51 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 413 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 216 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3413 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 909 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय व पुणे महानगर पालिका हद्दीतील 20 शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणा-या आहेत. सोशल डिस्ट्नसिंगचा (सामाजिक शिष्‍टाचार) अवलंब करुन एका खोलीत सात किंवा आठ जणांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत दोन वेळा चहा, नाष्‍टा तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटाइझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्‍या वा.ब.गोगटे विद्यालय निवारा केंद्र, नारायण पेठ, पुणे येथे एकूण 81 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये 1 नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव महेंद्र काडाईत आहे. याशिवाय परराज्यातील 16 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 64 व्‍यक्‍ती आहेत.

पुणे महानगरपालिकेच्‍या नागरवस्ती विकास योजनेंतर्गत रात्र निवारा प्रकल्प, सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ, पुणे येथे एकूण 12 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये 1 नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव देवजा असे आहे. परराज्यातील 2 व्‍यक्‍ती तर महाराष्‍ट्रातील 9 व्‍यक्‍ती आहेत.

पुणे महानगरपालिकेचे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण 37 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील 5 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 32 व्‍यक्‍ती आहेत.

पुणे महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रशाला निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण 49 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील 14 व्‍यक्‍ती तर महाराष्ट्रातील 35 व्‍यक्‍ती आहेत.