हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भाग सील -उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर

2245

पुणे प्रतिनिधी,

: राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदाची उपाय म्हणून नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा परिसर आज मध्यरात्री 12.00 वाजलेपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी आदेशान्वये दिली आहे.

साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 मधील तरतुदी व तहसिलदार हवेली यांच्या अहवालानुसार हवेली तालुक्यातील वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जाभुंळवाडी आणि कोळेवाडी या ग्रामपंचायतीचा परिसर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आज मध्यरात्री 12.00 वाजलेपासून सील करण्यात येणार आहे. या परिसरातील संबंधित पोलीस स्टेशन प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना प्रवेशबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाकरीता घराबाहेर पडतांना प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक-जावक, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच येत्या काळात रुग्णांची संख्या लक्षात घेता इतर भागात देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येईल. त्यामुळे नागारिकांनी किमान सात दिवस पुरेल इतक्या जीवनाश्यक वस्तूंची गर्दी न करता खरेदी करावी, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी दिली आहे.
.
—————-